एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या वल्गना करत होते.
खरं तर कोकणाचा विकास करताना
इतर कोणत्याही प्रदेशाचा हवाला देण्याची गरज नाही आणि तसे उपमा अलंकार देऊन
स्थानिकांना आमिषं दाखवण्याची सुद्धा गरज नाही. किंबहुना कोणत्याच प्रदेशाला दुसऱ्या
एखाद्या प्रदेशाप्रमाणे बनवण्याच्या वल्गना करूच नयेत. कारण प्रत्येक प्रदेशाची स्वत:ची
एक जैवविविधता असते आणि ती जपण्यासाठी तिथला निसर्गच सक्षम असतो. अशा कोकणातील जैवविविधतेतील
शाश्वत जीवन शैलीची आत्यंतिक अंतस्थ, विचार प्रवर्तक, समग्र, उपयुक्त आणि तितकीच
रोचक माहिती देणारा ‘रानमाणूस’‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांनी एक निर्वाणीचा इशारा समस्त पर्यावरण प्रेमी,
अभ्यासक, कृतीशील कार्यकर्ते आणि त्याच पर्यावरणावर कुऱ्हाड चालवून शाश्वत
जीवनाच्या शाश्वतीला आपल्या अल्पजीवी महत्त्वाकांक्षेत गाडणाऱ्या अशा सर्व लोकांना
दिला आहे, तो म्हणजे कोकणाचा कॅलिफोर्निया नाही पण मुळशी पॅटर्न नक्की बनेल! काय आहे या इशाऱ्याचा अर्थ!
काही वर्षांपुर्बी मुळशी पॅटर्न नावाचा एका सिनेमा आला होता. यात दाखवेल आहे की, पुण्यातील ग्रामस्थांच्या जमिनी
विकत घेऊन तिथे हाय टेक कंपन्या सुरु केल्या जातात, मॉल्स उभारले जातात. तिथे
स्थानिकांना नोकरी न देता किंवा मोलमजुरीच्या कामाला लावून त्यांना अक्षरश:
देशोधडीला लावलं जातं. या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामाला येणाऱ्या हाय फाय
लोकांसाठी गगनचुंबी इमारती उभारल्या जातात. पण यात भरडलेल्या गेलेल्या जमिनीच्या
मूळ मालकांची मुलं मात्र गुंडगिरीच्या मार्गाला लागतात. ज्या कामामुळे आपल्या
घरादाराची राख रांगोळी झाली तेच काम करून चाकूच्या टोकावर ते लोकांकडून जमिनी हिसकावून
घेतात. एकच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले तरुण एकमेकांचे जीव घेऊ लागतात. स्वत: मरतात
आणि इतरांना मारतात, राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुली बनतात. यात त्या हाय टेक कंपन्यांमध्ये
काम करणाऱ्या आणि उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या लोकांचं काहीच वाकडं होत नाही. उलट या
लोकांना गुंड मवाली समजून त्यांच्या नावे नाकं मुरडतात. सर्वस्व गमावून बसलेल्या तरुणांना
यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, उलट ते अधिकाधिक गर्तेत सापडत जातात. अशा
प्रकारे एके काळाचा जमिनीचा राजा आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या पदरात रंकत्व
वाढून ठेवतो.
पुण्यातील हे चित्र कोकणात दिसू लागलं आहे ही काही
नवी बातमी नाही. पर्यटन व्यवसायासाठी कोकणाची क्षमता बघून इथे पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन
फार पूर्वीच दिलं गेलं. पण हे करत असताना इथल्या कोकणी माणसाचीच मदत घेऊन त्यांच्या
शाश्वत जीवन पद्धतीचं दर्शन आणि आस्वाद पर्यटकांना घेऊ देणं हा उद्देश असायला हवा
होता. पण कोणताही उपक्रम कोणत्याही आराखड्याविना करण्याच्या प्रशासकीय सवयीमुळे अनागोंदीला
पूर्ण वाव मिळतो जो आता कोकणातही दिसू लागला आहे. आता कोकणच्या बाहेरील अनेक लोक
इथे येऊन कवडीमोल भावाने जागा विकत घेऊ लागले आहेत. खेदाची बाब ही आहे की याची
जाहिरात खुद्द कोकणवासी तरुण आपल्या अनेक समाज माध्यमातून करत आहेत. पुण्या
मुंबईला आणि जगभरात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या लोकांच्या अनुपस्थितीचा फायदा
हे दलाल उचलतात. दापोली, रायगड, खेड, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी वाड्या वस्त्यांमधून गावातीलच
लोक ही दलाली करत असल्याने ते गावातील लोकांना सहज या जाळ्यात ओढत आहेत. या लोकांना
आपल्या जमिनीची किंमत सुद्धा माहित नसते. या लोकांना इथले दलाल पैशांचं आमिष
दाखवून, या पैशात तुम्ही मुंबईत मुलासाठी घर खरेदी करू शकता, मुला मुलींची लग्न
करू शकता, नातवंडांच्या परदेशी शिक्षणासाठी पैसा पुरवू शकता, अशा प्रकारच्या वल्गना
करून त्यांना जमिनीच्या कागदांवर सह्या करायला भाग पडतात. अशी माहिती मॅजिक मराठी मॅजिक मराठी ही युट्युब
वाहिनी चालवणाऱ्या तरुणाने दिली आहे. तो आपल्या व्हिडीओ एवढंही म्हणतो की एखादा
इन्शुरन्स एजंट आपल्याला आपल्या मरणाचे फायदे सांगणार नाही तेवढे हे दलाल जमीन
विकण्याचे फायदे या भोळ्या भाबड्या लोकांना सांगत असतात.
आजवर पुण्या मुंबईत किंवा जगभरात कामाधंद्यासाठी
राहणाऱ्या लोकांचं एकच स्वप्न असायचं ते म्हणजे आयुष्यभर शहरात काम करायचं आणि
सेवा निवृत्ती नंतर गावी जाऊन सुशेगात जगायचं. यापुढे हे स्वप्न किती लोकांचं
पूर्ण होईल हे सांगता येत नाही. शिवाय आता नोकऱ्या राहिल्या नाहीत. पूर्वी पुण्या
मुंबईला जाणारे तरुण आता युद्धाने पेटलेल्या इस्त्राईल आणि जगण्याची शाश्वती नसलेल्या
अरब देशात मोलमजुरीसाठी जात आहेत. अशा तरुणांनी किंबहुना सर्वच कोकणी तरुणांनी माघारी
येऊन आपल्या मातीत, शेतीत राबण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जमिनीवर कोकणाचा
जीवच काढून घेतलेले रिसोर्ट उभे राहिलेले पाहिले तर इथे मुळशी पॅटर्न व्हायला फार काळ लागणार नाही. युट्युबच्या
माध्यमातून रानमाणूस प्रसाद गावडे सारखे अनेक युट्युबर्स हा धोका लक्षात आणून देत
आहेत. आताच याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे, नाहीतर फार उशीर होईल.
== विनिशा धामणकर
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.