कोकणात जेव्हा खूप जास्त
सुख सुविधा पोचल्या नव्हत्या तेव्हाचा तो काळ. अडनिडे रस्ते, एका गावाहून दुसऱ्या
गावी जायचं तर डोंगर चढून उतरून करावा लागणारा प्रवास आणि रात्रीच्या वेळी वीज
गायब होण्याचा शिरस्ता. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो की हे
सर्व अनुभव घेण्यात बालपण रंगून जायचं. यात रात्रीच्या वेळी भुताखेताच्या गप्पा
मारणं हा जितका विरंगुळा असायचा तितकाच तो बालपणीचा ठेवा असल्याचं आज मागे वळून
पाहताना जाणवतं. भूतं असतात की नसतात हा विचार न करण्याचा तो काळ. त्यामुळे
रात्रीच्या गडद अंधारात खळ्यात बसून अशा भुताच्या कहाण्या ऐकताना लांबून आपल्या
जवळ येणारे दोन डोळे दिसू लागले की ओठावर नकळत ‘राम राम राम राम’ यायचं आणि मोठे
लोक पण यावर ‘ती हडळ आहे, ती आता आली की आपल्या सर्वांना मारून टाकेल’ अशा घाबरगुंडीचं
भूत बसवू लागले की पार पाचावर धारण बसायची. लहान मुलं आतल्या घरात पाळायची नाहीतर
आईच्या पदरात तोंड खुपसून एक डोळ्याने बाहेरचा अंदाज घ्यायची. ते भयाण डोळे जवळ म्हणजे
अगदी खळ्यात आले की ते डोळे हडळीचे नसून दूर गावाहून कंदील घेऊन येणारे गावातलेच
कोणी तरी आहे हे समजायचं. या घटनांमुळे हळू हळू रात्रीच्या कथांमधली भीड चेपत गेली
आणि मग या कथा अधिक आवडू लागल्या होत्या. पुढे सायको थ्रिलर इंग्लिश सिनेमे आवडू
लागले त्यामागे हेच कारण होतं. असं असलं तरी भूतं आणि कोकणाचा एक वेगळाच ऋणानुबंध
आहे. पण हा तेवढा ऋणानुबंध म्हणूनच घेतला पाहिजे. रानमाणूस प्रसाद गावडे म्हणतो
तसं आमच्या जागेवाल्याच्या बळावर आम्ही सुंदर आणि नेचर फ्रेंडली जीवन जगतो; मराठी हॉरर
मालिकेत दाखवतात तसं आमचं कोकण भीतीदायक नाहीये. कोकणासारख्या निसर्गाचा वरदहस्त
असणाऱ्या परिसरात भुतांच्या कथा तोंडी लावायला ठीक आहेत. पण म्हणून कोकणात भूतांचा
वावर आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आणि मनात असलेल्या भीतीवर विजय मिळवण्याचा
धडा सुद्धा याच लाल मातीत मिळतो. ‘मुंज्या’ या चित्रपटातही या भीतीवर विजय
मिळवण्याचा संदेश दिला असला तरी त्याला एका हॉरर कथेची जोड आहे.
मुंज झाल्यानंतर १०
दिवसाच्या आत मृत्यू झालेल्या मुलाचा ब्रम्हराक्षस होतो तोच मुंज्या. भित्यापाठी
ब्रम्हराक्षस ही म्हण या चित्रपटात तंतोतत वापरली आहे. म्हणजे चित्रपटाच्या
हिरोच्या म्हणजेच बिट्टूच्या पाठीवरच हा ब्रम्हराक्षस आपल्या बोटांचे ठसे उतरवतो
आणि त्याचं माध्यमातून तो त्याला हव्या असलेल्या मुन्नीशी लग्न लावून देण्याचा
हट्ट करतो. मुन्नी आता जख्खड म्हातारी झालेली असल्याने मुंज्या तिची नात असलेल्या
आणि बिट्टू मनातून जिच्यावर प्रेम करत असतो त्या बेलाशी लग्न करण्याचा हट्ट करतो.
या सगळ्यातून एका घाबरट मुलापासून एका शूर मुलात बिट्टूचं परिवर्तन कसं होतं याची
ही सर्व कथा आहे.
कथा कोकणात घडत
असल्याने कोकणाचं खूप सुंदर विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याने टिपले आहेत, ही सर्वात
जमेची बाजू. मराठी माणसांची या हिंदी कथेचे दिग्दर्शन अजय सरपोतदार यांनी केलं आहे
आणि बॉक्सऑफिसवर त्याची कमाई तुफान झाली आहे. अशीच मराठी माणसांची हिंदी भयकथा ‘तुंबाड’
मधून दिसली होती. या चित्रपटाची प्रचंड प्रशंसा झाली पण बॉक्सऑफिसवर फार कमाई झाली
नव्हती. सध्या चित्रपटगृहात असलेला ‘चंदू चॅम्पियन’ ही सुद्धा मराठी माणसाची कथा.
आता मराठी दिग्दर्शकांनी हिंदीची वाट धरल्याने महाराष्ट्रीय चित्रपट उद्योग राष्ट्रीय
पातळीवर पोहोचला आहे आणि त्यात त्याची वाहवा देखील होते आहे, ही खचितच आनंदाची बाब
आहे.
बिट्टूच्या भूमिकेतील
अभय वर्मा याने आधी घाबरट आणि मग धीट मुलगा छान उभा केला आहे. त्यांने यापूर्वी ‘मर्जी’,
‘लिटील थिंग्स’ या वेब सिरीज केल्या आहेत. सारा अली खान सोबत ‘ए वतन मेरे वतन’ मध्येही
तो होता. ‘फॅमिली मॅन २’ या वेब सिरीजमध्ये त्याने मनोज वाजपेयीच्या समोर अभिनय
केल्याने अनेकांच्या नजरेत तो भरला. त्याच्या शिवाय मोना सिंग, शर्वरी वाघ,
सत्यजित (बाहुबलीतील कटाप्पा), सुहासिनी जोशी, अजय पुरकर, भाग्यश्री लिमये यांच्या
सह लहान मुलांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच. दलजित सिंग धिल्लो उर्फ
स्पीलबर्गच्या भूमिकेतील तरन सिंगचा कॉमिक सेन्स जबरदस्त.
मुख्य भूमिका आहे ती
मुंज्याची. टेक्नोलॉजीतून तयार झालेल्या या चित्रपटीय मुंज्यामुळे कधीही कोणी न
पाहिलेल्या ब्रम्हराक्षसाचे आपल्याला भौतिक रुपात दर्शन लाभले. त्याच्या आकांडतांडवी
स्वभावाला ‘तू ब्रम्हराक्षस नाहीस तर एक १० वर्षांचा बिनडोक मुलगा आहेस,’ या
बिट्टूच्या वाक्याने आळा बसतोय, तो विचार करू लागलाय असं त्याच्या हावभावावरून
दिसत असतानाच तो बेलाशी लग्न करण्याची गळ घालतो आणि आपल्या मूळ पदावरच येतो.
भावभावनेतील हे पदर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप चांगले दाखवले आहेत.
कथा कोकणातली आणि
भुताची असली तरी फार भीतीदायक नाही, कारण शेवटी या भूताच्या भीतीपेक्षा माणसाचं
धैर्य मोठं असतं. हा संदेश देणारा हा चित्रपट एक निखळ आनंद नक्कीच देतो.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.