जळगांव जामोद : वेगवेगळ्या चवींच्या आरोग्यदायी पाककृतीचा आस्वाद अन तो सुद्धा अगदी रानावनात श्रावण मासात घेण्याचा अद्वितीय आनंद म्हणजे सालईबन येथील रानभाजी उत्सव ! रविवारी १८ ऑगस्टला तो संपन्न झाला.

अगदी अमरावती, अकोला, जळगांव खान्देश संभाजीनगर पर्यंतच्या अनेकांना या खाद्योत्सवाची भुरळ पडली होती.  उच्च पोषण मूल्य असणाऱ्या रानभाज्यांचे २५ विविध खाद्य पदार्थाचे जेवण,  रानभाज्यांची प्रदर्शनी, रानभाजी बनविण्याचे प्रात्यक्षिक, शिवारफेरीतून  रानभाज्यांची ओळख, माहिती, सेल्फी पॉईंट, पथनाट्य अशा वैशिष्ठ्यांसह दिवसभर हा सोहळा पार पडला. 

तरुणाई फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी ३ दिवस श्रमदान करून उत्सवात  रंगत आणली. रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवरांनी व शहरी नगरीकांनी उपस्थिती दर्शविली. 

पावसाळी रानभाज्यांच्या आगळ्या चवी चाखता याव्या, रानभाज्यांचं संवर्धन व्हावं, रोजच्या आहारात असलेल्या विषयुक्त भाज्यांची माहिती व्हावी, पिढीजात संक्रमित होणारे हे लोकविज्ञान आपल्या विस्मरणात जाऊ नये आणि कमी होत चाललेल्या जंगल क्षेत्रातून या वनस्पती कायमच्या नाहीशा होऊ नये या उद्देशाने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. जेनेटिकली मॉडिफाइड व संकरित बियाणी व विकसित वाणांच्या गर्दीत आपलं देशी बियाणं हरवू नये, तसेच रानमेव्याला लोकप्रियता, राजमान्यता व प्रचार – प्रसार करण्यासाठी हा उपक्रम घेतल्या जातो.



मुख्य वस्तीपासून डोंगरात हा सोहळा ठेवण्यात आला असल्याने मर्यादित संख्येत व सहयोग निधी घेऊन रानभाजी चे वनभोजन देण्यात आले होते. वेळेवर शेकडो लोकांनी येण्याची  इच्छा प्रदर्शित केली होती मात्र अव्यवस्था  होऊ नये म्हणून त्यांना नकार द्यावा लागला. तरीही पूर्वसूचना न देता आलेल्या मोजक्या रानभाजी प्रेमींना सुद्धा यावेळी वनभोजनाची संधी मिळाली. सालईबनातील उत्सवाचे वैशिष्टये असे की फक्त माहितीच नव्हे तर पाककृती सांगीतल्या जाते व सर्व पाककृती ह्या तरुणाई फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने बनवून उपस्थितांना खाऊ घातल्या जातात. या उत्सवाला घरच्या गृहिणीची आपुलकी मिळत असल्याने इथे सालईबन मध्ये येण्यासाठी लोकं आतुर असतात.



रानभाजी हा आपला नैसर्गिक वारसा आहे. अगदी काही वर्षांपर्यंत त्याचा आहारामध्ये नियमित समावेश राहत होता. मात्र शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात विषारी औषधे, रासायनिक खते आणि तण नाशकांच्या वापरामुळे बऱ्याचशा रानभाज्यांची प्रजाती नष्ट झाल्या तर काही दुर्मिळ होत आहेत. दुसरीकडे रोजच्या जेवनात विषयुक्त अन्न खाण्यात येत असल्याने कॅन्सर, किडनी विकार, त्वचा रोग यासह मानसिक आजारांनी अनेक लोक ग्रस्त झालेले आहेत. येणाऱ्या काळात विषयुक्त आहारामुळे उदभवणाऱ्या आजारांनी बळी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढणार आहे.  या सगळ्यांत बदल व्हावा म्हणून  सेंद्रिय अन्न धान्याचा वापर करावा , घरी भाजीपाला पिकवावा या उद्देशाने हा रानभाजी उत्सव आयोजित केला जातो. 


सकाळी ९ वा. ते १२ पर्यंत ४ शिवार फेरी काढण्यात येऊन उपस्थितांना रानभाज्यांची ओळख शीतल पडोळ यांनी करून दिली. डॉ. राजेश भोंडे यांनी रानभाज्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म सांगितले तर वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी झाडांचे औषधीय महत्व सांगितले.  ३०० रानभाजी प्रेमींनी या शिवार फेरीत सहभाग घेतला होता. 

रानभाजी उत्सवाला जिल्हा उपवन संरक्षक सरोज गवस , जीएसटी सह आयुक्त तेजराव पाचारणे,  अपर्णाताई संजय कुटे, अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठाचे डॉ. दिलीप काळे,प्रसिद्ध बालरोग तज्ञ डाँ संदिपजी वाकेकर, डाँ सतीषजी शिरेकार, किरणबापू देशमुख  यांच्यासह अनेक प्रतिष्ठित अधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती. 



शिबिराच्या संयोजिका सुचिता शामकुमार उमाळे, ज्योती कोल्हे, जयश्री पिठोरे, सुनिता पवार, प्रगती सोनटक्के, साधना पाचारणे, सुयशा कांडेकर, अनिताकौर, दीपा भोपळे, बोराळे, ज्योती धंदर,  संध्या काळे,  लीलावती कांडेकर, डाँ देवयानी मानकर यांच्यासह अनेक महिलांनी रानभाजी गोळा करणे, निवडणे व त्यापासून आरोग्यदायी पाककृती बनविणे, वाढणे ही सर्व कामे उत्साहाने केली. 



शिबिराच्या आयोजनासाठी तरुणाई फाउंडेशन खामगांव, महात्मा गांधी लोकसेवा संघ चालठाणा, सुनगाव ग्रामपंचायत,  वनविभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता.  सालईबनचे व्यवस्थापक मंजितसिंग शीख,  तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सचिव राजेंद्र कोल्हे, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सहसचिव उमाकांत कांडेकर, अविनाश सोनटक्के, रमेश बोराळे, योगेश ठेंगझोडे,  अशोक धर्मे, सुरेश टाकर्डे,  गजानन व्यवहारे, संजय फाटे, शाम उमाळे, चारुदत्त कांडेकर, दिलीप काळे,  मंगेश ढेंगे, अजय बत्तुलवार, ओम गिरी, मनोज कुयटे, अभिषेक आकोटकर, देवाशिष उमाळे, गजानन खेडकर ,टिम तरूणाई कार्यकर्त्यांनी  रानभाजी सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले.