उर्मिला पवार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गौरवोद्गार
उर्मिलाताईंचे ‘निळे आभाळ सोबतीला’ हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला उर्मिलाताईंचे ‘आयदान’ पुन्हा वाचण्याची इच्छा झाली. ती भावना उर्मिलाताई यांच्याकडे व्यक्त केल्यावर त्या म्हणाल्या की ‘आयदान’ हे फार निरागसपणे लिहिलेलं आहे. त्यामानाने आताच्या पुस्तकात रुक्षपणा जाणवेल त्यामुळे आता ‘आयदान’ वाचू नकोस. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. या पुस्तकातील कथन सुद्धा ‘आयदान’ इतकंच ओघवतं आणि निरागस आहे असे गौरवोद्गार असं मत अभिनेत्री चिन्मयी सुर्वे यांनी काढले. ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार यांच्या ‘निळे आभाळ सोबतीला’ (आयदान नंतरचा अवकाश) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अपरांत साहित्य कला प्रबोधिनी आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट संदर्भ ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबईच्या माजी प्राध्यापिका, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. वंदना सोनाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विचारमंचावर प्रा. आशालता कांबळे, उर्मिला पवार, डॉ. वंदना सोनाळकर, ज. वि. पवार, डॉ. प्रज्ञा दया पवार आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते हे उपस्थित होते.
चिन्मयी सुर्वे पुढे
म्हणाल्या की, घरात चळवळीचं वातावरण असल्यामुळे विद्यापीठाचं नामांतर किंवा अशा
अनेक संघर्षांच्या चर्चा लहानपणापासून माझ्या कानांवर सतत पडतच राहिल्या आणि मी
घडत गेले. त्यामुळे या चळवळीशी माझं घनिष्ट नातं आहे. या सर्व संघर्षाचं किंबहुना
इथल्या वेगवेगळ्या स्तरातील स्त्रियांनी दिलेल्या लढ्याचं दस्तावेजीकरण होणं
आवश्यक आहे असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी त्यांनी आपल्या आईने
नामांतराच्या चळवळीत घेतलेल्या सहभागाविषयी सांगून तीन दिवस उपास घडल्यावर माईसाहेबांनी
दिलेल्या शेंगा या आईने कशा पदरात बांधून आणल्या आणि आम्ही त्या प्रसाद म्हणून
खाल्ल्या अशी आठवण सांगितली. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा’
या मालिकेतील आपल्या आठवणीही सांगितल्या आणि इतरांचे पुतळे हे राष्ट्रपुरुषांचे
पुतळे असतात तर बाबासाहेबांचे पुतळे हे महामानवाचे असतात, अशी भावना व्यक्त केली.
तत्पूर्वी प्रा. आशालता
कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘अपरांत साहित्य कला प्रबोधिनी’ या संघटनेची
माहिती देताना कोकणातील साहित्यिकांनी एकत्र यावं आणि नव्याने लेखन करणाऱ्यांना मार्गदर्शन
आणि त्यांच्यावर संस्कार करून त्यांना परिवर्तनवादी साहित्य चळवळीत काम करण्यास
प्रेरित करावं या हेतूने ही संघटना स्थापन झाली असल्याचं नमूद केलं. यासह उर्मिलाताईंनी
आपल्या अनुभवाचा ठेवा पुढल्या पिढीला देता यावा म्हणून या वयातही हे लिखाण
करण्याचं धैर्य दाखवलं असं म्हणून लेखिकेचं कौतुकही केलं.
उर्मिलाताई आपल्या मनोगतात
म्हणाल्या की, जसं आपलं वय झालं की आपली मुलं आपल्याला देश विदेशात फिरवून आणतात
तशीच लेखकाची पुस्तकं आपल्याला देश विदेशात फिरवून आणतात, म्हणून पुस्तक हे
लेखकाचं मूल असतं. मला चळवळीत जे लोक भेटले त्यांच्याविषयी मी या पुस्तकात लिहिलं
आहे असं म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकाची माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकार युवराज
मोहिते यांनी आपल्या मनोगतात पुरुषी मानसिकतेच्या व्यवस्थेवर मृणाल गोरे यांनी कसे
प्रहार केले आणि ट्रेन मधील स्त्रियांच्या डब्यातील हँडल्सपासून ते लेडीज ट्रेन
पर्यंतच्या लढ्याची आठवण करून दिली. पुस्तक प्रकाशनासारख्या कार्यक्रमात तरुणांच्या
रोडावत जाणाऱ्या संख्येवर त्यांनी खेद व्यक्त केला. पण त्यांच्यापुढे असणाऱ्या
जगण्याचा आणि तगण्याचा संघर्षही त्यांनी नमूद केला. उत्क्रांतीच्या अभ्यासात Survival of the fittest विषयी आम्ही शिकलो
होतो. म्हणजेच जो काळाशी जुळवून घेतो असतो तोच स्पर्धेत टिकतो असं सांगून Ambedkarite
Thought is the fittest for the survival असं निरीक्षण नोंदवलं. यासाठी
आपण तरुणांशी संवाद साधला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
आयदान आणि आताचं पुस्तक यात
२३ - २४ वर्षांचा काळ गेला आहे. ‘आम्हीही इतिहास घडवला’ याचं हे पुढचं पाउल आहे
असं डॉ. प्रज्ञा दया पवार आपल्या मनोगतात म्हणाल्या. या पुस्तकात त्यांनी दलित
पँथरच्या लढ्यापासून सुरुवात केली आणि त्याचा शेवट हा अलीकडेच झालेल्या ‘अभिव्यक्ती
स्वातंत्र्यावरील’ कार्यक्रमाची नोंद घेत केला. या सर्व घटना बघताना आम्ही याकडे
कसं बघतो हे त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे. त्यामुळे यात त्यांनी आपल्यातल्या
लेखिकेला बाजूला ठेऊन कार्यकर्तीला समोर आणलं आहे. अनलंकृत भाषा, विनोद आणि
उपरोधाचा उपयोग करत त्यांनी दलित पितृसत्ताक व्यवस्थेचे दर्शनही यात घडवलं आहे, असंही
त्या पुढे म्हणाल्या.
डॉ. वंदना सोनाळकर यांनी
आपल्या मनोगतात चळवळ समृद्ध होण्यात ‘आयदान’चं योगदान मोठं आहे. मात्र ‘आम्हीही
इतिहास घडवला’ हे सुंदर काम त्या मानाने दुर्लक्षितच राहिलं असं म्हणाल्या.
शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज. वि. पवार यांनी दलित पँथरच्या लढ्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. नामदेव ढसाळ, दया पवार यांच्या सोबतचे आपले संबंध त्यांनी विषद केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात अर्जुन डांगळे, हिरा बनसोडे, हिरा पवार, सुबोध मोरे, रमेश शिंदे, सुमेध जाधव, सुनील हेतकर, संजय खैरे, प्रा. आनंद देवडेकर, योगिराज बागुल, वासुदेव पवार, भावेश लोखंडे, प्रा. रवी देवगडकर, श्यामल गरुड, कुंदा प्र. नि., कुंदा निळे, नामदेव ढसाळ यांचे पुतणे स्वप्नील ढसाळ आणि पुतणी संगिता ढसाळ, नंदा कांबळे, कविता मोरवणकर, डॉ. अश्विनी तोरणे, सम्राटचे स्मृतिशेष संपादक बबन कांबळे यांचे पुत्र कुणाल कांबळे असे अनेक सन्माननीय गण उपस्थित होते. अभिनेते निलेश पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या वाणीने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. नंदा कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
2 Comments
खूप छान झाला कार्यक्रम
ReplyDeleteहो खरंच. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ReplyDeletePost a Comment
Please do not add any spam link in the comment box.