पा. रंजीथच्या ‘थंगलान’ या चित्रपटावर गेल्या दोन आठवड्यापासून बरीच चर्चा होत आहे. 

अनेकांनी खूप बारीक आणि समर्पक परीक्षण, विश्लेषण केलं आहे. पा. रंजीथ आणि ‘थंगलान’ या दोन्ही विषयावर लोक मनापासून व्यक्त होत आहेतच सोबतच आजवर आपल्या भावना ज्या आपल्यातच बोलल्या आणि चर्चिल्या जात होत्या त्या आता किमान राष्ट्रीय स्तरावर व्यक्त केल्या जात आहेत याविषयी समाधान आणि आनंद व्यक्त करत आहेत. पण हे पुन्हा तेच आंबेडकरी विचारधारेचे लोक करत आहेत ज्यांना पा. रंजीथचं आजवरचं चित्रपटीय काम हे दलित वंचितांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब कसं अधोरेखित करतं हे माहित आहे. इतर लोक मात्र याला ‘केजीएफ’ या सिनेमाचा प्रीक्वेल किंवा जास्तीत जास्त ‘केजीएफ की असली कहानी’ एवढाच संकुचित अर्थ लावत आहेत. म्हणजेच ‘कोलार गोल्ड फिल्ड’ मधील सोनं काढण्यासाठी इंग्रजांनी तिथल्या स्थानिकांवर कसा अन्याय केला याची खरी कथा म्हणजे ‘थंगलान’ आहे असा अर्थ काढला जात आहे. खरं तर ‘थंगलान’ची कथा एक प्रतीकात्मक कथा आहे. ‘थंगलान’चा अर्थच ‘सोन्याचा पुत्र’ असा आहे. म्हणजेच त्यात जे सोनं आहे ते आत्मसम्मान, स्वाभिमान, स्वभान, समता आणि बंधुभावाचं आहे आणि याचा वारसा चालवणारा आहे ‘थंगलान’. हे सोनं अधोरेखित करण्यासाठी केवळ सोन्याचं प्रतीक येतं. ‘थंगलान’ची कथा इंग्रजांच्या कैक शतके आधी सुरु होते. नायकाच्या आजोबांचाही खापरपणजोबा किंवा त्याच्याही आधीचा पूर्वज हा त्याच्या काळातील नायक आहे. थंगलानच्या तोंडूनच या आपल्या पूर्वजांच्या सत्यकथेचा उल्लेख येत असल्याने हे सर्व इंग्रजांनी केलं हा समज आधीच दूर व्हायला हवा होता. भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटलं जायचं पण त्या सोन्याचं रक्षणही मातृसत्ताक संस्कृती करत होती त्याची ही कथा आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे.



गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला तर महापरिनिर्वाण इसवीसन पूर्व ४८३ मध्ये झाले. नायकाचा म्हणजेच ‘थंगलान’चा पूर्वज हा जातीयतेने तुडुंब भरलेल्या समाज व्यवस्थेतील एक सामान्य पण लढाऊ नाग वंशीय आणि आपल्या समुदायासोबत वेशीबाहेर राहणारा माणूस आहे. या दरम्यान गौतम बुद्धाच्या हयातीत आणि नंतरही धम्माचा प्रसार होत राहिल्याने वेशीबाहेरच्या माणसाला सुद्धा स्वभान आलं होतं. आपल्या जमिनी आपल्याकडून हिसकावून आपल्याला दास करून घेणाऱ्यांच्या विरोधात त्याच्या मनातही राग आहे. बंडखोरी त्याच्या बलदंड शरीर आणि जागृत मनोवस्थेतून झळकते आहे. यासाठीच तो ब्राम्हणाने दाखवलेल्या जागी सोन्याचा शोध घेऊन सोनं काढून देण्याचा राजाचा आदेश धुकाडवून लावतो. कारण या सोन्याच्या खाणीची राखणदार नागवंशीय मातृसत्ताक राणी ‘आरती’ ही आहे आणि ती आपल्या निसर्ग आणि संपत्तीचं संरक्षण प्राणाची बाजी लावून करते. त्या सोन्याला हात लावणारा माणूस जीवानिशी जाऊ शकतो म्हणून हे काम करण्यास तो नकार देतो. ब्राम्हण त्याला जबरदस्ती करतो तेव्हा हा पूर्वज त्या ब्राम्हणाला ‘तू इतिहास गाडलास तेव्हा तुला भरभराटीचं जीवन मिळालं आहे,’ याची त्याला आठवण करून देतो. मात्र इथे आपल्या समुदायाची अकिंचन अवस्था दूर करायची असेल आणि स्वाभिमानाने जगायचं असेल तर हे धाडस करावं लागेल हा विचार करून तो राजाकडे आपल्याला सोन्याच्या बदल्यात जमीन हवी या बोलीवर तो सोनं खणून काढायला होकार देतो. इथेच मातृसत्ताक आणि पितृसत्ताक मधील संघर्ष सुरू होतो.



आरती आणि तिचे नागवंशी सैन्य त्याचा पराभव करतात. ही ताकद या मुनिमुळे म्हणजेच बुद्धामुळे आली आहे, या बुद्धामुळे समाजातील कनिष्ठ वर्ग, दलित वंचित वर्ग जागृत होऊ लागला आहे असा कांगावा करत राजाला हा बुद्धच जमीनदोस्त करण्यास सांगतो आणि राजा बुद्धीने वागा म्हणून सांगणाऱ्या बुद्धाचं डोकंच छाटून टाकतो. आरती विरुद्धच्या युद्धात ‘थंगलान’चा पूर्वज तिच्या पोटावर वार करतो आणि तिच्या पोटातून निघणाऱ्या रक्तातून सर्व भूमी सोन्याची होऊन जाते. त्या मातृसंस्कृतीने स्वत:चं रक्त दिलं तेव्हा त्यातून सोन्याची भूमी जन्माला आली, याचंच हे प्रतिक. ही आहे पार्श्वकथा.

आरती आणि थंगलानच्या पूर्वजाच्या संघर्षात येणाऱ्या ब्लॅक पँथरच्या रूपाने स्वभानाची एक लाट येता येता निसटून गेली, हे खूप प्रत्ययकारीपणे पा रंजीथ दाखवतो. पुढे ‘थंगलान’च्या आयुष्यात मात्र हा ब्लॅक पँथर मुलांसोबत खेळताना दिसतो यावरून या समाजात दलित पँथरचा एक ओझरता का प्रवेश झालेला आपल्याला जाणवतो.      

‘थंगलान’चा स्वत:चा आणि त्याच्या समुदायाचा संघर्ष अनेक प्रतिकांनी भरलेला आहे. यात थंगलानचा मुलगा अशोक जमिनीत गाडल्या गेलेल्या बुद्धाच्या मूर्तीच्या डोक्यावर तिचं छाटलेलं डोकं बसवतो आणि पुन्हा एकदा क्रांतीचे वारे वाहू लागतात हा अप्रतिम प्रसंग आहे. पुढे अनेक प्रसंगात बुद्धाची शांत मुद्रा आपल्याला पार्श्वभागावर दिसत राहते.

स्वत: साहेबाच्या वेशात आलेला थंगलान आपल्या समुदायातील बायकांसाठी चोळ्या आणतो हा प्रसंग अनेक पौराणिक, ऐतिहासिक गोष्टींचं कोंदण फोडून बाहेर येतो.

मातृसत्ताक समाजावर पितृसात्तेचं अतिक्रमण झाल्यावर कनिष्ठ जातीतील स्त्रियांना चोळी घालण्यावर बंधनं घातली गेली होती. आजही आंध्रप्रदेशातील अनेक स्त्रिया चोळी घालत नाहीत. यामागे रामायणातील कथा सांगितली जाते की लक्ष्मणाला लग्नाची मागणी घालायला गेलेल्या शूर्पणखेचं नाकच नाही तर तिचे वक्षही त्याने छाटून टाकले होते. या कथेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या स्त्रियांनी चोळी घालू नये असं त्यांच्या वर बिंबवलं गेलं आहे. म्हणूनच या स्त्रियांसाठी थंगलान जेव्हा चोळ्या आणतो तेव्हा त्यांना आपला आत्मसन्मान, आपल्या स्त्रीत्वाची प्राणप्रिय प्रतिष्ठा परत मिळाल्याप्रमाणे भावविभोर होऊन त्या आनंदाने नाचतात. 

आरतीच्या विरोधात युद्ध न करता आपणही तिच्यासारखेच नागवंशी आहोत हे भान जेव्हा थंगलानला येतं तेव्हा त्याला स्वत:ची खरी ओळख पटते आणि तेव्हाच त्याला सोन्याची गुहा सापडते. त्या गुहेत त्याला शतकानुशतके त्यांच्यावर राज्य करणारे, त्यांच्या दुर्धर जगण्याला कारण असणारे सर्व राजांचे भास या गुहेत होतात. त्यात पेशवे सुद्धा असतात.

या सर्व संघर्षात आता आरती एक दंतकथा बनून या सोन्याच्या पुत्राच्या म्हणजेच थंगलानच्या सोबत राहून आपल्या प्रकाशमान भविष्यासाठी बुद्ध विचारांची कास कधी सोडू नका असं सांगत राहते. दडलेल्या वास्तवाचं हे सोनेरी उत्खनन अनेकांना विचारप्रवृत्त करणारं आहे.

विक्रम, पार्वती, मालविका मोहनन, पसुपती, डॅनियल कॅल्टागिरोन या कलाकारांनी नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या अभिनयाचं आव्हान उत्तमरीत्या पेललं आहे.



स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानंतर का होईना वंचित बहुजन समाजाचा आवाज मोठ्या पडद्यावरून बुलंद होऊ लागला आहे. आज नागराज मंजुळे म्हणू शकत आहेत की, ‘बाबासाहेब माझा बाप आहे तर शिवाजी माझा आजोबा आहे.’ मंजुळे आणि पा रंजीथ या सिनेमा संस्कृती सह वाचन संस्कृती वाढवून अधिक आंबेडकरी तरुण दिग्दर्शक घडवत आहेत. इतिहास आणि वर्तमानाचा अभ्यास करून आजवर न सांगितलेला इतिहास सांगून लोकांसमोर सत्य ठेवत आहेत. पा रंजीथ म्हणतात तसा ‘मॅजिकल रिअॅलिस्टिक सिनेमा’ या चित्रसृष्टीचाही चेहरा मोहरा बदलून समाजात मोठे बदल घडवेल अशी आशा आहे.  
हे निरीक्षण तुम्हाला कसे वाटले ते खाली कमेंट करून नक्की सांगा. 
धन्यवाद 
- विनिशा धामणकर