महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेचा जागतिक स्तरावर ठरणार विश्वासार्ह
पुनर्प्रक्रिया केलेल्या
पाण्याच्या गुणवत्तेवर होणार शिक्कामोर्तब
मुंबई महानगरपालिकेच्या
मलनिःसारण प्रयोगशाळेला राष्ट्रीय परीक्षण आणि अंश परीक्षण प्रयोगशाळा अधिस्विकृती
मंडळाकडून (एनएबीएल) शुक्रवारी मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे पालिकेच्या
प्रयोगशाळेत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता शिक्कामोर्तब
होणार आहे.
एनएबीएल मानांकन प्राप्त
झाल्यामुळे आता महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेचा अहवाल फक्त भारतातच नव्हे
तर,
जागतिक पातळीवर विश्वासार्ह ठरणार आहे. मलनिःसारण प्रक्रिया
केलेल्या पाण्याची तपासणी महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत अधिकाधिक होवून पर्यायाने
महसूल वाढीसाठी देखील फायदा होणार आहे, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी
यांनी व्यक्त केले.
मुंबई महानगरपालिकेच्या
मलनिःसारण विभागाची प्रयोगशाळा १९३५ सालपासून कार्यरत आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक
तांत्रिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. तसेच, प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी केलेल्या अनेक
प्रयत्नांपैकी मलनिःसारण प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना महानगरपालिका
आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून
सुविधा अद्ययावत करून या प्रयोगशाळेला मानांकन मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात
आले. महानगरपालिका क्षेत्रात मलनिःसारण व्यवस्थेमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण
सुधारणा व्हाव्या, यादृष्टीने
करण्यात आलेल्या प्रयत्नांना मिळालेल्या यशापैकी एक एनएबीएल मानांकन ठरले आहे.
मुंबईतील मलनिःसारण
व्यवस्थेची विभागणी कुलाबा, वांद्रे, वरळी, मालाड, भांडुप, घाटकोपर
अशी करण्यात आली आहे. मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात
आलेले पाणी समुद्रात सोडण्याआधी या प्रकल्पाच्या ठिकाणी शुद्ध केले जाते. पुनर्प्रक्रिया
केलेल्या पाण्याचा वापर उद्यानासाठी, तसेच शौचालयाच्या वापरासाठी करणे शक्य असते. त्यासाठी
महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाच्या प्रयोगशाळेत तब्बल २२ निकषांवर आधारित
पाण्याची चाचणी होते. पुनर्प्रक्रिया झालेले पाणी समुद्रात न सोडता
पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी करणे, हे चाचणी करण्याचे उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण पाणी
पुनर्वापरासाठी मिळणे हा चाचणीचा उद्देश आहे. मुंबईतील खासगी मलनिःसारण प्रक्रिया
प्रकल्प चालकांनाही या प्रयोगशाळेतून पाणी तपासणी करणे शक्य आहे. महानगरपालिकेच्या
प्रयोगशाळेला मानांकन मिळाल्याने अशा चाचण्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होण्याची
शक्यता आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.