व्हाईटहेवन शहराजवळ प्रस्तावित नवीन कोळसा खाणीची जागा


इंग्लंडमधील प्रस्तावित कोळसा खाणीला लंडन उच्च न्यायालयाच्या निर्णयाने परवानगी नाकारली आहे. शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायमूर्ती होलगेट यांनी इंग्लंडच्या कम्ब्रिया येथील व्हाईटहेमध्ये प्रस्तावित कोळसा खाणीसाठी सुविधा निर्माण करण्याची योजना पुढे जाणार नसल्याचा निर्णय दिला. यामुळे पर्यावरणप्रेमीं आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याला त्यांनी Victory For The Environment असे म्हटले आहे.

गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकारचे राज्य सचिव अँजेला रेनर यांच्या वकिलांनी सांगितले की, डिसेंबर २०२२ मध्ये खाणीसाठी नियोजन परवानगी देण्याच्या निर्णयात कायद्यातील त्रुटी होती.

फ्रेंड्स ऑफ द अर्थ आणि साउथ लेक्स अॅक्शन ऑन क्लायमेट चेंज या दोन संघटनांनी या लढ्याला यश आले आहे.

या प्रस्तावित खाणीचे पर्यावरणीय परिणामांचे मुल्यांकन करताना केवळ खाण खणताना होणारे परिणाम लक्षात घेतले गेले. कोळसा जाळल्यानंतर होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मुल्यांकन केले गेले नाही.

गेल्या वर्षी इंग्लंड मधील सरेमधील वेल्डवरील हॉर्स हिल येथे तेल ड्रिलिंग विहिरीसाठी दिलेली नियोजन परवानगी रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नवीन जीवाश्म इंधन प्रकल्प सुरू करताना, त्यांना मान्यता द्यायची की नाही हे ठरवताना कोळसा, तेल आणि वायू जाळण्याचा हवामानावर आणि सजीव सृष्टीवर काय परिणाम होईल हे विचारात घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. हॉर्स हिलच्या या निर्णयानंतर नवीन जीवाश्म इंधन विकासाच्या योजनांवरील कम्ब्रिया कोळसा खाणीवर हा न्यायालयाचा पहिलानिर्णय आहे.

फ्रेंड्स ऑफ अर्थचे ज्येष्ठ वकील नियाल टोरू म्हणाले की, ही विलक्षण बातमी आहे आणि आपल्या पर्यावरणासाठी आणि या हवामानास हानीकारक आणि पूर्णपणे अनावश्यक असलेल्या कोळशाच्या खाणीविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाचा मोठा विजय आहे. हॉर्स हिल येथे तेल ड्रिलिंगवर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर निर्णय घेतलेला हा पहिला जीवाश्म इंधन खटला आहे. आजचा निर्णय खाण कंपनीच्या विरोधात गेला असल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होऊ शकतात, कारण जगातील अनेक देशात अशी प्रकरणे आहेत जिथे जीवाश्म इंधन प्रकल्पांविरुद्ध समान आधारावर आव्हाने दिली जात आहेत.

या निर्णयानंतर गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकारचे राज्य सचिव अँजेला रेनर यांना या कोळसा खाण प्रकल्पाचा संपूर्ण वातावरणीय प्रभाव लक्षात घेऊन नियोजन अर्जावर पुनर्विचार करावा लागणार आहे. यासाठी त्या नवीन पुरावे मागवू शकतात, नियोजन चौकशी पुन्हा सुरू करू शकतात किंवा ही खाण कंपनी पुन्हा ड्राफ्ट करून अर्ज पुन्हा सबमिट करू शकते.

गेल्या वर्षी सरेमधील वेल्डवरील हॉर्स हिल येथे सुरू असलेल्या तेल ड्रिलिंग विहिरीसाठी दिलेली नियोजन परवानगी रद्द करण्यासाठी सारा फिंच यांनी सरे काउंटी कौन्सिलच्या निर्णयाला आव्हान दिले होते. सारा फिंच यांनी युक्तिवाद केला होता की केवळ तेल ड्रिलिंग साइटच नव्हे तर प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभावांचे मूल्यांकन करताना तेल वापरण्यापासून हरितगृह वायू उत्सर्जनाचा देखील विचार केला पाहिजे.

त्यावेळी पाचपैकी तीन न्यायाधीशांनी त्यांच्या मतावर सहमती दर्शविली होती. त्यांनी आपल्या निकालात म्हटले होते की, जीवाश्म इंधन काढण्याचा संपूर्ण उद्देश हायड्रोकार्बन्स ज्वलनासाठी उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणून हे निश्चितपणे म्हणता येईल की, एकदा का तेल जमिनीतून काढले गेले की, त्यातील कार्बन लवकरच किंवा नंतर कार्बन डायऑक्साइडच्या रूपात वातावरणात सोडला जाईल आणि त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होईल. त्यामुळे प्रकल्पांना मान्यता द्यायची की नाही हे ठरवताना कोळसा, तेल आणि वायू जाळण्याचा हवामानाचा परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे.

याशिवाय पॅरीस कराराच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने असे म्हटले आहे की जर जागतिक तापमान जर १.५ सेल्सिअस (२.७ फेरनहाईट) एवढे मर्यादित ठेवायचे असेल कोळसा, तेल आणि वायूचे नवे स्त्रोत शोधू नये.

हॉर्स हिलच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर नवीन जीवाश्म इंधन विकासाच्या योजनांवरील हा कम्ब्रिया येथील कोळसा खाणीला मान्यता न देण्याचा हा उच्च न्यायालयाचा पहिलाच निर्णय आहे.