‘आंबेडकरी आई’या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे प्रतिपादन

मुंबई : जी आई शिक्षणाला महत्व देते, जी आई पुरुषप्रधान व्यवस्थेला प्रश्न विचारते ती आई आंबेडकरी आई होय. अशी आई या ग्रंथात आहे. बाबासाहेबांच्या मूल्यांचे बोट धरून जगल्या म्हणून त्या जत्रेत हरवल्या नाहीत अशा या आई आहेत. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य या आईंमध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी ‘आंबेडकरी आई’या ग्रंथप्रकाशन सोहळ्यात केले. प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्यामल गरुड यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रमुख वक्ते डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. अजित मगदुम हे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या स्त्रिया स्वत: कशा जगल्या आणि आपल्या मुलांना कसं घडवलं याचा पट ४२ लेकींनी या ग्रंथात मांडला आहे. डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे तर आंबेडकरी स्त्री संघटनेने या सोहळ्याचे आयोजन केले होते. 

या नावातच संघर्षाचा पट

डॉ. कार्व्हालो पुढे म्हणाल्या, या ग्रंथात दिसणारी आईचं मातृत्व हे जैविक मातृत्वापासून सामाजिक मातृत्वापर्यंत सामावलेलं आहे. हे फक्त आईचं चरित्र नसून ते आजी, पणजीचं चरित्र आहे. आंबेडकरी आई या नावातच संघर्षाचा पट आहे. या आईंनी आपल्या लेकींना जीवनाचे सत्व, तत्व दिले त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणावर मात करायला शिकवले आहे. आंबेडकरी आईचा प्रवास हा मनुस्मृतीपासून संविधानसंस्कृती पर्यंतचा आहे. 

हे केवळ स्मृतीरंजन नाही

डॉ. अजित मगदुम आपल्या संबोधनात म्हणाले, आईविषयी लिहायचं म्हटलं की भावनिकता येते. पण हे लेखन भावनिकतेने लिहिलेले नसून तटस्थपणे वास्तव मांडणी केली आहे. हे केवळ स्मृतीरंजन नाही. जे घडले आहे ते या सर्व लेकींनी या ग्रंथात मांडलं आहे. या आंबेडकरी आईंनी आपल्या नैतिक विचारातून, व्यावहारिक शहाणपणातून सामाजिक चारित्र्याचा वस्तुपाठ ठेवला आहे व तो सर्व समाजाला दिशादर्शक ठरेल. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आमच्यासाठी शिक्षण म्हणजे अक्षर ओळख नव्हे. गुलामीला उत्तर देण्याची सुरुवात शिक्षणाने होते. याचे भान असणाऱ्या या आई आहेत, असे प्रतिपादन केले. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आंबेडकरी आईत आत्ममग्नता नाही, असे सांगून दलित सहित्याचे हे पुढचे स्थित्यंतर आहे असा गौरव केला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ग्रंथांचा संदर्भ देत या ग्रंथाचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले. दलित साहित्यातील साचलेपण या पुस्तकाने दूर केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

अनेक आईंनी लावली उपस्थिती

तत्पूर्वी ग्रंथाच्या संपादिका प्रा. आशालता कांबळे यांनी या ग्रंथाची संकल्पना मांडली. नंदा कांबळे आणि सुरेखा पैठणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत याचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात प्रणेश वालावलकर यांनी रेखाटलेले प्रत्येक आईचे रेखाचित्र पडद्यावर दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला पुस्तकात वर्णन केलेल्या अनेक आईंनी उपस्थिती लावली होती. यात उर्मिला पवार, हिराताई बनसोडे, हिराताई पवार याही उपस्थित होत्या. याशिवाय ज्योती म्हापसेकर, ज. वि, पवार, सुरज येंगडे, डॉ. श्रीधर पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दीक्षा राजेश शिर्के आणि वैभवी अडसूळ यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली.