शंभूराजांच्या अग्नीवर आपापली पोळी भाजतोय
इतिहासाचा ऱ्हास इतिहासातच झाला
वर्तमानाचा घासही त्याच्याच पोटी गेला
इथे बहुजनच बहुजनांची टाळकी फोडतोय
लिहिणारे राहिले पडद्यात, वाचणार उगा कातावतोय
तिकडे ट्रम्प तात्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगतोया
आपल्याच लेकरा बाळांना बेड्या साखळ्या ठोकतोय
युएसएडच्या नावाने देशाची बदनामी करतोय
त्याविरोधात कोणता मावळा रस्त्यावर उतरतोय?
नोकरी नाही, अन्न महाग जगण्याचा प्रश्न मारतोय
याचा प्रतिकार कोण शंभू, शिवभक्त करतोय?
वेगानं बदलणारा काळ आक्रंदून सांगतोय
की डोक्यातल्या मेंदूचा वापर हल्ली फार कमी होतोय
मेंदू खुर्चीवरच्या भोंदूभोवती फिरतोय
तो नाचवतोय तास हा नाचतोय
उठसुठ कुंभमेळ्यात पापं धुवायला पळतोय
पुढच्या वेळी धुण्यासाठी आणखी पापं करतोय
पुरे झाला हा भंपकपणा काळ फार सोकावतोय
जाती, धर्म, प्रांत, भाषा भेद उकरून उकरून काढतोय
कुरघोडीच्या नशेत उन्माद बळावतोय
आणि उन्मदाच्या खिडकीतूनच विनाश डोकावतोय
उन्मदाच्या या खिडकीतूनच विनाश डोकावतोय
----
विनिशा
२३ फेब्रुवारी २०२५
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.