सेंद्रिय खतातून समृद्धीकडे वाटचाल

डहाणू : रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. डहाणू तालुक्यातील वाणगाव-आसनगाव येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारून याकडे एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाऊल उचलले आहे.

गांडूळ खत म्हणजे काय?

सेंद्रिय पदार्थ गांडूळांद्वारे पचन होऊन तयार होणारे खत म्हणजे गांडूळ खत. यामध्ये पिकांचे अवशेष, जनावरांचे उपउत्पाद, घरगुती कचरा, झाडांचे पानगळ व सांडपाणी यांचा वापर होतो.

गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया

गांडूळ खत तयार होण्यासाठी दोन ते अडीच महिने लागतात. तयार झालेले खत काळसर तपकिरी रंगाचे, चहाच्या भुकटीसारखे सैल व कणीदार असते. खत सुकवून चाळल्यानंतर शिल्लक राहिलेले गांडूळे आणि अंडकोष पुन्हा खत निर्मितीसाठी वापरले जातात.

गांडूळ खताचे फायदे

जमिनीचा पोत सुधारतो आणि पाण्याची धारणक्षमता वाढते. जैविक घटकांची संख्या वाढून जमिनीतील ह्युमसचे प्रमाण सुधारते.फळे व भाजीपाला चमकदार, चवदार आणि दीर्घकाळ टिकणारे मिळतात. जमिनीतील रासायनिक घटकांचा समतोल राखला जातो.

विद्यार्थ्यांची भूमिका:

कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प हाती घेतला. प्राध्यापक प्रवीण भोये व प्राचार्य सोनालिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. 'रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि त्याचे पर्यावरणीय नुकसान लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. आमच्या गांडूळ खत प्रकल्पामुळे आम्हाला रोजगारनिर्मितीचा आत्मविश्वास मिळाला आहे,' असे विद्यार्थिनी प्रतिमा डगला म्हणते.

निसर्गाचा समतोल राखा

सेंद्रिय खते वापरून विषमुक्त अन्न उत्पादनाचा मार्ग सुकर होतो. यामुळे मातीचा पोत सुधारतो, शेती उत्पादनात वाढ होते आणि पर्यावरण संवर्धन घडते. गांडूळ खताचा वापर करणे हे रोगमुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे.