कुंर्झे - ब्राम्हणगाव ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी


विक्रमगड : कंचाड ते पाचमाड या मुख्य मार्गावर कुंर्झे - ब्राम्हणगाव या गावांच्या मधून वाहत असलेल्या देहर्जे नदीवरील पूल अतिशय लहान व अरुंद असल्याने पावसाळ्यात अनेक दिवस हा पूल पाण्याखाली जातो. अनेकदा तीन ते चार दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद देखील होते. अनेक वर्षांपासून नागरिक तसेच विद्यार्थी यांची होणारी हेळसांड शासनाने लक्षात घेऊन या जागी नवीन पूल का उभारला जात नाही, असा संतप्त सवाल येथील लोकांनी उपस्थित केला आहे. 

कंचाड ते पाचमाड या मार्गावर खरंतर अनेक गाव, पाडे असून हा मार्ग येथील लोकांच्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावतो. कुंर्झे - ब्राम्हणगाव या गावांच्या सीमेवरून देहर्जे ही नदी वाहत असून या नदीवर एक पूल असून हा पूल उंचीने इतका लहान आहे की ज्यावरून अगदी किरकोळ पावसाने देखील पाणी येऊन अनेक दिवस वाहतूक पूर्ण ठप्प होते. या परिसरातील कुर्झे, कडीपाडा यासह अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा प्रश्न उभा राहत असून त्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असते. याशिवाय नोकरदार व अन्य प्रवाशांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात लोकांना विक्रमगडमार्गे प्रवास करावा लागतो तर अनेकदा तोही मार्ग ठप्प होतो.

या परिसरातील ही समस्या लक्षात घेऊन तात्काळ शासनाने या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करावी अशी लोकांनी मागणी केली आहे. रस्ता जिल्हा परिषदकडे असला तरी येथील पुलाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करायला हवेत अशी मागणी येथील ग्रामस्थाची आहे.

थोड्या पावसानेही रस्ता होतो बंद

मागील अनेक वर्षांपासून येथील नवीन पुलाची आमची मागणी आहे. हा अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात थोडा पूर आला तरी हा रस्ता बंद होऊन आम्हाला घरीच राहावे लागते. त्यामुळे प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देऊन येथे नवीन पूल उभारून द्यावा. 

-- कल्पेश शेलार, ग्रामस्थ, कुंर्झे गाव