Speak up if you want to bring change to the
world.
— Dr. DaShanne Spokes, U.S. author,
progressive activist, and Native American rights advocate
पूर्वी आपल्या अवतीभवतीचं
वातावरण खूप आल्हाददायक होतं असं नाही पण जे होतं तेही एखाद्या झंझावाताने
नेस्तनाबूत झाल्यानंतरची स्मशानकळा लागलेल्या आजच्या काळात स्वत:तील उमेद सळसळती ठेवणं,
प्रवाहित ठेवणं आणि ती आपल्या अवतीभवती तितक्याच समर्पणाने पेरत राहणं ही सोपी गोष्ट
नाही. आश्वासक भविष्यासाठी उर्ध्वमुखी झेप घेण्याच्या बेतात असताना अधोमुखी वर्तमानाचे
गुरुत्वाकर्षण खाली खेचत असते, तेव्हा कस लागतो तो तुमच्या जिद्दीचा, चिकाटीचा. तिथे
यश अपयश या सापेक्ष गोष्टींना महत्त्व उरत नाही. तुम्ही झेपावलात हे महत्त्वाचं
असतं. अशा विचाराचे जे काही थोडे लोक आज अवतीभवती आहेत त्यातच एक आहे ज्योती बडेकर
ही मनस्वी मुलगी. तिच्या एकूण कार्याची व्याख्या करायची तर अमेरिकेतील आघाडीची
राजकीय कार्यकर्ती, लेखिका आणि ब्लॅक पँथरची लढाऊ सैनिक अँजेला डेविस यांचं वक्तव्य
मला आठवतं. I am no longer accepting the things I
cannot change. I am changing the things I cannot accept. म्हणजे “ज्या
गोष्टी मी बदलू शकत नाही त्या गोष्टी मी आता स्वीकारत नाही, ज्या गोष्टी मी
स्वीकारू शकत नाही त्या मी बदलत आहे.” जगातील अनेक महनीय लोकांनी आजवर Be the
change you want to see अशा प्रकारचे संदेश जगाला दिले आहेत. पण
त्याप्रमाणे वागतात किती हा खरा प्रश्न आहे. ज्योती सारखे विरला लोक आहेत जे आपल्या
तत्त्वांसाठी झोकून काम करतात. त्यांच्या मार्गात ना कोणाची शिवीगाळ आडवी येत ना मोठमोठ्या
पदाची प्रलोभने.
![]() |
| On Field |
ज्योतीचं सामाजिक भान खरं तर
अगदी नकळत्या वयापासून विकसित होत गेलं आहे. तिच्यासोबतच्या गप्पांमधून तिच्यातील
बंडखोरीला खतपाणी घालणाऱ्या घटनांची जंत्रीच आपल्या समोर उघड होते. मग ते लहानपणी
गावी असताना घडलेल्या घटना असोत की मुंबईला आपल्या आईवडिलांकडे पळून आल्यावर
घडलेल्या घटना असू देत. तिने आपल्या विचारांशी कधीच प्रतारणा केली नाही. तिला जे
पटलं तेच तिने केलं. कारण तिला माहित होतं की तिच्या कोणत्याही कृतीने किंवा अगदी
शब्दानेही ती कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाहीये. हेच कारण आहे की परिस्थितीने नाडलेल्या
लोकांना तिचा आधार वाटतो. तिच्याकडे आपली गाऱ्हाणी घेऊन आलेल्या लोकांच्या कहाण्या
ऐकल्या की वाटतं, हिच्याकडे जनता दल (सेक्युलर) सारख्या एका राजकीय पक्षाचं वलय
आहे, चांगलं राजकारण करून मोठी पदं पदरात पाडून घ्यायची सोडून ही लोकांच्या अशा प्रश्नांना
का हात घालते ज्यावर इतर राजकीय नेते केवळ आश्वासनं देऊन त्याच पीडितांकडून लाखो
रुपये उकळून उलट त्यांचंच शोषण करतात? याचं उत्तर आहे ते म्हणजे लखलखीत आंबेडकरी
विचार. हे विचार मेंदूतील शेवटच्या पेशीपर्यंत मुरलेले असले की तो माणूस कधी त्या
विचारांचा अव्हेर करत नाही. मात्र ते विचार फक्त भाषणांपुरते असतील तर मग अशा
लोकांच्या अनेक चुलींवर चिकन, मटण रटरटत राहतं.
![]() |
| For Justice |
![]() |
| With Lokanche Dost |
ज्योतीची आजवरची सर्व कामं ही
रस्त्यावर उतरून केलेली आहेत. मग ते घरं पाडलेल्या लोकांच्या हक्कासाठी लढणं असू
देत की अन्नान्न दशा झालेल्या लोकांना अन्न पुरवणं असू देत. कोरोना काळात अनेक
संस्था, संघटनांनी आणि व्यक्तींनी सुद्धा अनेकांना मदत केली. ज्योतीने मात्र तृतीयपंथी
लोकांसाठी अन्नधान्य पुरवलं. तिच्या संवेदनशील मनाने हे ताडलं होतं की समाजातील सर्व
घटकांना अन्न मिळेल पण या तृतीयपंथी समुदायाकडे कोणाचं लक्ष तरी जाईल का? सरकार
यांच्यासाठी खास काही तजवीज करेल का? झालंही तसंच. शासकीय स्तरावर त्यांच्यासाठी काहीही
केलं गेलं नाही तेव्हा ज्योती त्यांच्यासाठी उभी राहिली.
![]() |
| Puja, Deepali, Rajpriya and Jyoti Badekar |
![]() |
| With Whole Badekar Falimy |
![]() |
| Actor, Activist Swara Bhaskar and Jyoti |
ज्योतीच्या या सर्व गोष्टींमुळेच
तिचा लोकसंग्रह मोठा आहे. मात्र या लोकसंग्रहाचाही तिने कधी फायदा उचलला नाही,
किंबहुना तिला तो उचलता आला नाही. त्यामुळे बाकी काही नाही झालं, पण आपली विधानसभा
एका फायरब्रँड व्यक्तिमत्वाला मुकली.
![]() |
| Jyoti with Mrunal Gore in Frame |
आज जेव्हा नेते एका घरातून दुसऱ्या घरात जावं इतक्या सहजतेने पक्ष बदलत आहेत तेव्हा आपण आपल्या मूळ विचारांच्या मूळ पक्षाशी बांधील राहणं म्हणजे काय हे ज्योतीकडून शिकावं. मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांनी जी ‘ज्योत’ पेटवली आहे ती पक्षबदलू नेत्यांमुळे इतक्या सहज विझणार नाही. अशा या नेत्रीला चांगली संधी मिळाली तर ती अडल्या नडलेल्या लोकांचं जीवन सुखकर करण्याचा शासकीय स्तरावर प्रयत्न करेल. व्यक्तीगत स्तरावर एखादा माणूस किती लढेल? तरीही आपलं वैयक्तिक आयुष्य सांभाळून ज्योती हे सर्व करत आहे. तिला संविधानिक पदाची साथ मिळाली तर समाज अधिक निखरून उठेल. अवतीभवतीची बेबंदशाही संपुष्टात येईल. पूर्वसुरींना समाजजीवन जसं पाहिजे होतं तसं ते निर्माण करण्याचा किमान पाया बांधला जाईल. तो दिवस लवकर येवो ही मनोमन अपेक्षा करते. ज्योती, तू निरंतर तेवणारी चिरंतन ज्योत बनून राहा.
ज्योतीचा आज वाढदिवस आहे. (कितवा याला काही अर्थ नाही) या दिवशी तिला अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्ती तिच्या सोबत असतील एवढी खात्री देते आणि तिला वाढदिवसाच्या सदिच्छा देते.
---- विनिशा धामणकर









0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.