रायगड दि. ३ एप्रिल :- राज्य शासनामार्फत ग्रामपातळीवर विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्याच्या विकासामध्ये ग्रामविकास आणि  लोकसहभाग खुप महत्वाचा असतो. या विकासाबाबत गावकऱ्यांचे अभिप्राय, अपेक्षा, समस्या आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज संवाद सेतू बांधला. निमित्त होते संवाद सेतू उपक्रमाचे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून  जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि गावकरी यांच्याशी हितगुज करण्यासाठी संवाद सेतू हा उपक्रम सुरु केला आहॆ. या उपक्रमंतर्गत आपटा आणि कर्नाळा ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, आरोग्य सेविक, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधला.

या उपक्रमाच्या माध्यमातून  गाव सक्षम करण्यावर आणि ग्राम विकासात लोकसहभाग वाढविणे तसेच समस्या तात्काळ सोडविण्यास प्राधान्य देणे हा मानस असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक आठवड्याला मंगळवार किंवा गुरुवार रोजी स. १० वा हा संवाद सेतू कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले.

आपटा ग्रामपंचायत उपसरपंच चव्हाण यांनी गावातील गटारी आणि पाणी पुरवठा समस्या सांगितली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना तात्काळ गटारी स्वच्छ करण्याचे तसेच त्याचे बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नरेगा मधून शोषखड्डे घेण्याबाबत निर्देश दिले. गावातील स्वछता गृह, पाणी पुरवठा, रस्ते, वीज याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणाना दिले.  आरोग्य सेवक, शिक्षक पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे लवकरच भरण्यात येईल असेही श्री जावळे आश्वस्त केले. तसेच प्रधानमंत्री जन मन योजने अंतर्गत मंजूर घरकुलाना अनुदान वितरित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  बानुबाई वाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टंचाई मधून करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिल्या.

कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत ६० व्यक्तींना शिधा पत्रिका वितरित केल्या आहेत परंतु त्या लिंक होऊन मिळाल्या नसल्याचे मधुकर पाटील यांनी सांगितले. या शिधापत्रिका ८ दिवसात लिंक करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. कर्नाळा ग्राम पंचायत हद्दीतील 7 वाड्या वस्त्या

घर व शेतजागा ३१० दावे निर्णयावाचून प्रलंबित  आहेत.  तसेच ७ वाड्यांना सामुदायिक वनहक्क प्रदान तथापि मोजणी घेऊन ताबा दिलेला नाही व विकास आराखडे प्रलंबित आहेत. याबाबत संबंधित तहसीलदार यांनी तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

या संवादसेतू उपक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांसह तहसीलदार, गट विकास अधिकारी, महसूल अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.