धारावीकर आराखड्याची करणार होळी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) सोमवारी पहिली प्रारुप पात्रता यादी अर्थात प्रारुप परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले आहे.
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी पहिली प्रारुप पात्रता यादी अर्थात प्रारुप परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले आहे. या प्रारुप परिशिष्ट-२ नुसार केवळ २५ टक्के धारावीकरांनाच धारावीत विनामूल्य घर मिळणार आहेत. ७५ टक्के रहिवासी धारावीकर बाहेर फेकले जाणार असल्याने आता धारावीकर आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने रहिवाशांना धारावीबाहेर फेकून धारावीची जागा अदानी समुहाला आंदण देण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप करीत आता धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’ने घेतला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत धारावीत विविध २०० ठिकाणी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याची होळी करण्याचा निर्णय धारावी बचाव आंदोलनाने घेतला आहे.
धारावीतच पुनर्वसन करावे या मागणीकडे काणाडोळा
धारावीकरांना ५०० चौरस फुटांचे घर मिळावे आणि सरसकट धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करावे अशा मुख्य मागण्या धारावीकरांच्या आहेत. पण या मागण्यांकडे काणाडोळा करीत सरकार धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे नेत असल्याने धारावीकर नाराज झाले आहेत. या नाराजीत आता आणखी भर पडली आहे. डीआरपीने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या प्रारुप परिशिष्ट-२ मध्ये सेक्टर ६ मधील गणेश नगर, मेघवाडी झोपडपट्टीतील ५०५ झोपड्यांसह अन्य बांधकामांचा या यादीत समावेश आहे. मात्र ५०५ पैकी केवळ २२८ झोपडीधारक पात्र ठरले असून उर्वरित अपात्र ठरले आहेत. त्याचवेळी २२८ पैकी केवळ १०१ पात्र झोपडीधारकांनाच धारावीत विनामूल्य घर मिळणार आहे. ही यादी पाहता एकूणच ७५ टक्के रहिवासी धारावीबाहेर फेकले जाणार आहेत. या पुढेही अशाच प्रकारे मोठ्या संख्येने धारावीकरांना धारावीबाहेर फेकले जाणार असल्याचे यावरून दिसत असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनाकडून करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता धारावीत नाराजीचे वातावरण असून धारावीकरांनी धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाकडून देण्यात आली.
डीआरपीने धारावी पुनर्विकासाचा बृहत आराखडा नुकताच जाहीर केला. या आराखड्याबाबतही धारावीकरांचे अनेक आक्षेप आहेत. त्यामुळे आता धारावी बचाव आंदोलनाने या आराखड्याचीच होळी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजू कोरडे यांनी दिली. पुढील दोन दिवसांत धारावीतील २०० ठिकाणी आराखड्याची होळी केली करण्यात येणार आहे. ही २०० ठिकाणे, वेळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
-----------
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.