तीन सहकाऱ्यांबरोबर मिळून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

Shubhanshu Shukla flied in Axiom-4 : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या तीन सहकाऱ्यांबरोबर मिळून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. नासाच्या फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे अमेरिकेतील फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी अवकाशात उड्डाण केलं. यानिमित्ताने ४१ वर्षांनंतर भारतीय व्यक्ती अंतराळात गेली आहे.

१९८४ मध्ये राकेश शर्मा हे पहिल्यांदा अंतराळात गेले होते. राकेश शर्मा यांनी जेव्हा अंतराळातून भारतात इंदिरा गांधी यांचाशी संपर्क साधला होता तेव्हा इंदिरा गांधी यांनी ‘अवकाशातून भारत कसा दिसतो असं विचारलं होतं. तेव्हा ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ असं उत्तर राकेश शर्मा यांनी दिलं होतं. याची आठवण आजही काढली जाते. राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात जाणारे इतिहासातील दुसरे भारतीय शुभांशू शुक्ला आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.

गगयान ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रामसाठी निवड

उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे जन्मलेले शुक्ला यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी २००६ मध्ये भारतीय वायुदलात त्यांना नियुक्त करण्यात आले. त्यांना इलिट कॉम्बॅट एअरक्राफ्टचा २,००० तासांचा फ्लाइट एक्सपिरिएन्स आहे. २०१९ मध्ये त्यांची निवड भारताच्या गगयान ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रामसाठी आणि नंतर ॲक्सिऑम मोहिम-४ साठी वैमानिक म्हणून निवड झाली.


शुभांशू शुक्ला यांच्या टीममधील अन्य तीन जण 

डॉ. पेगी व्हिटसन या एक अग्रगण्य अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्या यापूर्वी अंतराळात ६७५ दिवस राहिल्या आहेत, त्या AX-4 मिशनची धुरा वाहण्यासाठी या टीममध्ये सामील झाल्या आहेत. इतिहासातील सर्वात अनुभवी अमेरिकन अंतराळवीर म्हणून, व्हिटसनचा प्रचंड अनुभव आणि स्थिर नेतृत्व या मोहिमेच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. प्रचंड ताण असतानाही अगदी शांत राहण्याच्या वैज्ञानिक कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या व्हिटसनच्या नेतृत्वामुळे अंतराळातील अपेक्षित संशोधन मोहिम फत्ते होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्यांच्यासोबत दोन मिशन विशेषज्ञ सामील झाले आहेत: पोलंडचे साओझ उझ्नान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापुल. सेर्नमध्ये (CERN) पार्श्वभूमी असलेले भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता असलेले उझ्नान्स्की युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रतिनिधित्व करतात आणि AX-4 मिशनमध्ये आपल्या सखोल वैज्ञानिक ज्ञानाचे योगदान देतील. पोलंडचे दुसरे अंतराळवीर म्हणून, त्यांचे लक्ष सूक्ष्मगुरुत्वाकर्षण (microgravity) प्रयोगांवर आणि ESA च्या संशोधन उद्दिष्टांना पुढे नेण्यावर असेल. तिसरे अंतराळवीर आहेत टिबोर कापुल. हे हंगेरीचे दुसरे अंतराळवीर आणि देशाच्या HUNOR अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. पॉलिमर तंत्रज्ञान आणि रेडिएशन शील्डिंगमध्ये (radiation shielding) त्यांना कौशल्य अवगत आहे.