परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : दि.२४ जुलै २०२५
मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
हा निर्णय जाहीर करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘’गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षण साठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा देखील मुंबई व उपनगरातील प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल ५ हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू आहेत. मात्र, प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. हे लक्षात घेता हा तोटा काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परंतु,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे.’’
मागील वर्षी ११.६८ कोटी रुपये नुकसान
मागील वर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना ४,३३० बसेस व परतीच्या प्रवासासाठी १,१०४ बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या. तथापि, एकेरी गट आरक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये इंधन खर्च, चालक वाहकांचे वेतन, अतिकालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडला. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल ११ कोटी ६८ लाख रुपये तोटा महामंडळाला सहन करावा लागला. यंदा ५ हजार बसेस सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या सर्व बसेस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा १३ ते १६ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
--------=
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.