रियाद : वृत्तसंस्था

सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांवर काळाने घाला घातला आहे. मक्काहून मदीनाकडे जाताना भारतीय प्रवाशांच्या बसला एका डीझेल टँकरने जोरात धडक दिली. ही दुर्घटना मध्यरात्री दीड वाजता घडली.

बसमधील सर्वजण झोपेत असतानाच काळाने घाला घातला अन् क्षणात परिसरात हाहाकार माजला. बसमधील ४५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमधील सर्वाधिक लोक हैदराबादमधील असल्याचे समजते. ते मक्काहून मदीना येथे निघाले होते. बसमधील महिला, मुले अन् इतर सर्वजण झोपेत होते. पण त्याचवेळी मुहरासजवळ डिझेल टँकरने जोरात धडक दिली अन् दोन्ही वाहनांनी पेट घेतला. पाहता पाहता बसचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले. आतमध्ये असणारे बाहेर येण्यासाठी आरडाओरडा करत होते. परिसर किंकाळ्यांनी हादरून गेला होता. लहान मुले, महिलांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेतून फक्त एक प्रवासी वाचला. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बसला आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आग विझवताना अग्निशामन दलाचे कर्मचारी दिसत आहेत.

आग इतकी प्रचंड होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन ते चार तास लागल्याचे सांगण्यात येत आहे. ९ नोव्हेंबर रोजी भारतातून ५४ जण यात्रेला गेले होते. यातील चार जण रविवारी कारने मदिनाला गेले तर इतर चार जण मक्का येथेच राहिले. हे भाविक २३ नोव्हेंबर रोजी परतणार होते.

तेलंगाणा सरकार रियादमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. दूतावासकडून सांगण्यात आले की, सौदी अरेबियाच्या मदीनाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे.

तेलंगणा मंत्रिमंडळाने पीडितांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदतनिधी जाहीर केले. मृतांवर त्यांच्या धार्मिक रीतीरिवाजानुसार सौदी अरेबियात अंत्यसंस्कार केले जातील आणि प्रत्येक दिवंगत कुटुंबातील दोन सदस्यांना अंत्यसंस्कारासाठी सौदी अरेबियाला घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाईल, असेही तेलंगणा सरकारने ठरवले आहे. 

जेद्दामध्ये भारतीयांसाठी २४ तास कंट्रोल रूम केले आहे. ८००२४४०००३ या क्रमांकावर कधीही संपर्क करू शकतात. तसेच तेलंगणा सरकारकडूनही हैदराबाद आणि राज्यातील प्रवाशांच्या कुटुंबासाठी ७९९७९ – ५९७५४ आणि ९९१२९-१९५४५ क्रमांक जारी केले आहेत.

दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. या घटनेवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि काँग्रेस पक्षानेही दुःख व्यक्त केले.