डावीकडून आनंद भंडारेडॉ. दीपक पवारउद्धव ठाकरेगिरीश सामंतडॉ. माधव सूर्यवंशी आणि सुशील शेजुळे

१४ डिसेंबर रोजी ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांसाठी आक्रोश परिषदेचे आयोजन


मुंबई, दि. ३ डिसेंबर

राज्यभरातून तिसऱ्या भाषेच्या सक्तीला एवढा टोकाचा विरोध झाल्यानंतर डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुन्हा तिसऱ्या भाषेची/हिंदीची सक्ती करण्याची चूक करेल असे वाटत नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना व्यक्त केला.

मराठी अभ्यास केंद्र व शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या आणि गिरीश सामंत आणि डॉ. प्रकाश परब यांनी संपादित केलेल्या ‘पहिलीपासून हिंदी/त्रिभाषासक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण (२०२५)’ या पुस्तिकेच्या प्रति भेट देण्यासाठी शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या शिष्टमंडळामध्ये समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार, सचिव आनंद भंडारे, पुस्तिकेचे संपादक गिरीश सामंत, ‘शिक्षण विकास मंच’चे डॉ. माधव सूर्यवंशी आणि ‘आम्ही शिक्षक संघटना’चे सुशील शेजुळे यांचा समावेश होता. या वेळी शिवसेना पक्षप्रमुखांनी या संपूर्ण लढ्याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि सद्यःस्थितीबद्दलचा अभिप्रायही दिला.

समितीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठी शाळा आणि मराठी भाषाविषयक मुद्द्यांचा जाहीरनाम्यात अनिवार्यपणे समावेश करावा, या मागणीसाठीचे सविस्तर निवेदन शिवसेना पक्षप्रमुखांना देण्यात आले. या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात निश्चित समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. हे सविस्तर निवेदन पुढीलप्रमाणे:

१.     मराठी शाळांचे जतन व सक्षमीकरण करणे ही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी राहील. विनाअनुदान तत्त्व मराठी माध्यमाच्या शाळांना लागू केले जाणार नाही.

२.     शिक्षण मंडळ बदलताना मराठी माध्यमाच्या शाळांचे माध्यम मराठीच राहील याकडे लक्ष दिले जाईल. तशी अट ठेवली जाईल.

३.     मराठी माध्यमाच्या शाळांना संरक्षण व प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातील.

४.      'मातृभाषेतून शिक्षण' ह्या तत्त्वाप्रमाणे व्यवहार व्हावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पालकप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातील.

५.     मराठी शाळांच्या जीर्ण, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ दिला जाणार नाही. मराठी शाळेची जागा मराठी शाळेसाठीच वापरली जाईल.

६.     मराठी शाळांच्या शिक्षकभरतीकडे व त्यांच्या अन्य प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल.

त्यानंतर समितीचे सचिव आनंद भंडारे यांनी मुंबईतील ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांबद्दलचे सादरीकरण शिवसेना पक्षप्रमुखांसमोर केले. या प्रश्नाची तड लावण्यासाठी रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश परिषद (ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांसाठीची परिषद) आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेबद्दल शिवसेना पक्षप्रमुखांना सविस्तर माहिती देण्यात आली. या शाळांबाबतचे प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार विचारतील आणि त्यांची तड लावतील, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला.

शिवसेना पक्षप्रमुखांची ही भेट चळवळीच्या पुढच्या टप्प्यातील अनेक महत्त्वाच्या भेटींपैकी पहिली भेट आहे. समितीचे प्रतिनिधी येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना भेटून त्यांना ही पुस्तिका अभिप्रायार्थ देणार आहेत. तसेच, या आंदोलनाच्या निमित्ताने उभे राहिलेले मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्माचे सांस्कृतिक राजकारण याबद्दल व्यापक विचारविनिमय होणार आहे.