मुंबई, दि. ४ : प्रतिनिधी

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी झालेल्या महापरिनिर्वाण दिनी निघालेल्या अन्त्ययात्रेचे चित्रीकरण करून एक महत्त्वाचा दस्तावेज निर्माण करून ठेवणाऱ्या ‘दलित मित्र’ नामदेवराव व्हटकर यांच्या कुटुंबियांचा सत्कार बुधवार, दि. ३ डिसेंबर रोजी मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ‘हर सवाल का जवाब बाबासाहब’ या कार्यक्रमात करण्यात आला. सन्मान चिन्ह आणि नामदेवराव व्हटकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे मानपत्र असे या सत्काराचे स्वरूप होते. नामदेवराव व्हटकर यांची मुलगी शालिनी मच्छिंद्रनाथ कळंबे यांनी या सत्काराचा स्वीकार केला. यावेळी नामदेवराव व्हटकर यांचा नातू महेश अशोक व्हटकर, नात डॉ. सोनाली कदम, नातसून कल्पना महेश व्हटकर, पणती अॅड. प्राजक्ता व्हटकर, पणतू राजमल्हार व्हटकर  हेही मंचावर उपस्थित होते.

या सत्कारापूर्वी कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी नामदेवराव व्हटकर यांची अल्प माहिती सांगितली आणि मंजुषा गोवर्धन यांनी मानपत्राचे वाचन केले. या सत्कारानंतर अनेक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही या कुटुंबियांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

सामाजिक कार्यकर्ते रवी भिलाणे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला जातो. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. ज्येष्ठ लेखक यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या माईसाहेब आंबेडकर हे या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं. अवघ्या काही मिनिटात त्यांनी ‘आंबेडकरमय’ झालेल्या माईसाहेबांच्या आयुष्याचा आढावा घेतला. याशिवाय छाया कोरेगावकर, जयवंत हिरे, संदेश कर्डक, निनाद सिद्धये, महेश बनसोडे यांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. या सोबतच आरे येथील तरुणांनी आदिवासी नृत्य, राकेश सुतार आणि सचिन सुतार कृत विरार ग्रुपचा नाट्याविष्कार सादर करण्यात आला.  दिपाली बडेकर, अदिती सातपुते, गजेंद्र मांजरेकर, बाळासाहेब उमप, शैलजा सावंत, अनहद संध्या संदेश, जोत्स्ना बनाळे, जया सातपुते यांनी बाबासाहेबांना गाण्यातून अभिवादन केले. या कार्यक्रमाला विजय सुरवाडे, माजी आमदार बाबुराव माने, दिवाकर शेजवळ, सुमेध जाधव, सुबोध मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्योती बडेकर आणि संजय शिंदे यांनी केले. शेवटी संदेश गायकवाड यांनी गीत आणि संगीतबद्ध केलेले ‘‘हर सवाल का जवाब बाबासाहब’चे संकल्पना गीत गायले गेले. राजू शिरदनकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

----====----