‘शिप ऑफ थीसियस’ हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर एकदा नक्की पहा. आनंद गांधी या दिग्दर्शकाने एका अत्यंत वेगळ्या विषयावर यात भाष्य केलं आहे. शिप ऑफ थीसियस ही मूळ ग्रीक कथा आहे, ज्यात थीसियस ह्या काल्पनिक ग्रीक तरुणाकडे त्याचं ३० वल्ह्यांनी चालवलं जाणारं जहाज होतं. तो आणि त्याचे काही मित्र वादळ, वारा आणि समुद्राच्या भयाण लाटांचा सामना करत क्रेटेहून अथेन्सला ते जहाज घेऊन येतात. थीसियसचं जल्लोषात स्वागत होतं. या जहाजाचं ‘शिप ऑफ थीसियस’ असं नामकरण होतं. कालांतराने त्या जहाजाचा एक एक भाग निखळू लागतो. तेव्हा मग स्थानिक लोक त्याचे खराब भाग काढून त्याला नवीन वेगवेगळे भाग लावून दुरुस्त करतात आणि मग अगदी नवीनच जहाज तयार होतं. या कथेतून एक वेगळाच विचार समोर येतो तो म्हणजे सर्व भाग बदलल्यानंतर सुद्धा हे जहाज जुनं ‘थीसियसचंच’ जहाज आहे का?

या विचारप्रयोगाचा सर्वात जुना उल्लेख प्राचीन ग्रीक इतिहासकार प्लूटार्च यांनी त्यांच्या लिखाणात केला आहे. पुढे थॉमस हॉब्स या विचारवंताने ‘शिप ऑफ थीसियस’ या विचारप्रयोगाला एक महत्त्वाची नवी दिशा दिली. त्यांनी मूळ प्रश्नाला आणखी गुंतागुंतीचे रूप देत विचारले की, जहाजातील जुने भाग फेकून न देता जतन केले आणि नंतर त्याच मूळ भागांपासून दुसरे जहाज बांधले, तर खरे थीसियसचे जहाज कोणते मानायचे? या प्रश्नातून हॉब्स यांनी वस्तूंची ओळख, बदल आणि सातत्य (Identity, Change and Continuity) यांविषयीची मानवी समज किती गुंतागुंतीची आहे हे दाखवून दिले. पुढे हा विचारप्रयोग मानवी शरीर, स्मृती, व्यक्तिमत्त्व आणि आत्मसत्ता यांच्या चर्चांमध्येही वापरला जाऊ लागला.

हॉब्स यांच्या या मांडणीला आज हॉब्स पॅरेडॉक्स ‘Hobbes' Paradox’ असेही म्हटले जाते. हा विरोधाभास तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.

माणसामध्ये सुद्धा जन्मापासून अनेक बदल होत असतात, किंबहुना सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीत नेहमी बदल होत असतात. तरीही जन्माच्या वेळी मिळालेली ओळखच माणसाला मरेपर्यंत सोबत करते. पण तो माणूस जो जन्माला आला तोच असतो का? हा प्रश्न प्लेटोसह अनेक तत्त्ववेत्यांनी विचारला आहे. याचं उत्तर म्हणूनच की काय “बदल हीच सर्वात स्थिर प्रक्रिया आहे” असं आपण म्हणतो.

आपल्यात बदल होतो तरीही आपण तेच असतो. पण आनंद गांधी यांनी या कथेशी अगदी तंतोतंत अशी मानवाशी आणि अगदी आजच्या काळाशी सुसंगत कथा रचली आणि मानवी भावभावनांचे, संवेदनांचे पदर त्या कथेला दिले आहेत. यात त्यांनी म्हटलं आहे की, एक माणूस जर आपल्या मृत्युनंतर आठ जणांना आपले आठ अवयव दान करीत असेल तर तो खरंच मेला आहे का? तो त्या अवयव असलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून जिवंत नाही का? माणूस जिवंत असणं म्हणजे काय तर त्याचे अवयवांची प्रक्रिया सुरू असणं, मग ज्याला दान केले त्या व्यक्तीकडे दात्याचे अवयव चालू अवस्थेत असतील तर तो माणूस जिवंत नाही, असं कसं म्हणता येईल?

या चित्रपटात दाखवलं आहे की प्राचीन गुंफांचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा एका अपघातात मृत्यू होतो आणि या तरुणाचे आठ अवयव त्याच्या इच्छेप्रमाणे दान केले जातात. चित्रपटात अवयव दानात मिळालेल्या तीन व्यक्तींची प्रमुख कथानकं आहेत. यात एक इजिप्शियन अंध फोटोग्राफर मुलगी आहे आलिया. ही अंध असताना तिच्यामध्ये फोटोग्राफीचा खूप चांगला सेन्स असतो. तिला अवयव दानात कॉर्निया मिळतो. एक जैन भिक्षु आहे मैत्रेय. त्याला लिवर सिरोसीस होतो. तेव्हा त्याला दानात लिवर म्हणजेच यकृत मिळतं. आणि एक मारवाडी व्यावसायिक आहे नवीन. त्याला किडनी मिळते. मैत्रेय जो जैन भिक्षु असतो तो जैन धर्मात पशुहत्या वर्ज्य असते म्हणून औषध निर्मितीसाठी होत असलेल्या पशुहत्येच्या विरोधात कोर्टात केस लढत आहे. तो याच कारणासाठी सिरोसीसमुळे शरीर खंगूनसुद्धा औषध घेत नाही. पण चार्वाक नावाचा एक तरुण वकील त्याला कोर्टात भेटतो आणि तो त्याला पशुहत्या कशी आवश्यक असते किंवा हे जग असंच चालतं याविषयी वादावादी करत असतो. मैत्रेय त्याला शक्य तेवढी उत्तर देतो. पण चार्वाक शेवटी मैत्रेयला सांगतो की औषध निर्मितीसाठी तू पशुहत्या वर्ज्य मानतोस पण आज तुझ्या शरीरावर उपचार न करता तू त्या म्हणजे एका सजीवालाच मारत नाहीयेस का? या प्रश्नासरशी यकृत ट्रान्सप्लांटसाठी मैत्रेय तयार होतो. नवीन हा एक पक्का मारवाडी असतो, त्याला  किडनी  मिळते. हे अवयव मिळाल्यानंतर त्यांच्यात थोडे थोडे बदल होतात पण या बदलांना इतर अनेक पदर आहेत.

शेवटी त्या दात्या तरुणाचे अवयव देण्यासाठी ज्या संस्थेने पुढाकार घेतलेला असतो ते त्या सर्व रेसिपियंट्सना एकत्र आणतात. प्लुटोने म्हटलं आहे की प्रत्येक माणूस हा आपल्याच शरीर रुपी गुहेचा ‘एक्सप्लोरर’ असतो. माणूस त्याच्या अस्तित्वाला कायमचं अस्तित्व मानतो पण प्रत्यक्षात ते तात्पुरतं किंवा क्षणिक असतं. आज ते ज्याचं आहे ते उद्या दुसऱ्याचं होऊ शकतं. शेवटी दात्या तरुणाचा ‘केव एक्सप्लोररिंग’चा विडीओ पाहताना हाच अनुभव प्रत्येक रेसिपियंट घेत असतो. आपले अवयव सुद्धा आपले नसतात तर आपण बाहेरच्या जगावर काय म्हणून हक्क गाजवत असतो? जे नवीन आहे ते जुन्याला सोबत घेऊन नवीन झालेलं असतं. पण त्या नव्याचं अस्तित्व हे स्वतंत्रच असतं, हा साधा संदेश या सगळ्यात आहे, असं मला वाटतं.

विनिशा धामणकर