मुंबई प्रतिनिधी 



गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईला हादरवून सोडलेल्या बलात्कार प्रकरणातील ३० वर्षीय पिडीत महिलेने अखेर काळापुढे आपले हात  टेकले

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना आज म्हणजे ११ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मोहन चौहान या इसमास अटक केली आहे. या आरोपीसोबत आणखी एक किंवा अधिक लोक या प्रकरणात सामील असू शकतात असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.    

मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोड इथे उभ्या असलेल्या एका टेम्पोत या गुन्हेगारांनी हा अमानवी प्रकार केला. ते केवळ ह्या महिलेवर पाशवी बलात्कार करून थांबले नाहीत तर त्यांनी तिच्या गुप्तांगात सळई सुद्धा घुसवली आणि तिला जबर मारहाण केली. ही मारहाण होत असताना एका व्यक्तीने पाहिलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस येईपर्यंत त्या महिलेला तशाच अवस्थेत टाकून आरोपी पळून गेले होते. पहाटे साडेतीन वाजता साकीनाका पोलीस घटनास्थळी पोहोचले तेंव्हा पिडीत महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत त्या टेम्पोतच पडलेली होती. गंभीर अवस्थेत तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले. पोलीस तिच्या शुद्धीवर येण्याची आणि तिची जबानी घेण्याची वाट पहात होते. पण ती वेळ आलीच नाही. महिलेने त्याआधीच आपले प्राण त्यागले.

ज्या परिसरात तो टेम्पो होता तिथे असलेल्या एका सीसीटीवी मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या सीसीटीवी फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मोहन चौहान या इसमास अटक केली. त्याच्यावर एफआयआर दाखल करून त्याच्यावर भादंविच्या  ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३७६ (बलात्कार), ३२३ (सहेतुक इजा पोहोचवणं), ५०४ (जाणूनबुजून अपमान करणं) या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याच्या इतर साथीदारांच्या शोधात आहेत.

दरम्यान, काल महापौर किशोरी पेडणेकर ह्या पीडितेला भेटण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गेल्या होत्या. तेंव्हा त्यांनी तिच्यासोबत तिची आई आहे असं माध्यम प्रतिनिधींना सांगितलं होतं. पिडीत महिला ही गेली दहा बारा वर्षं टेम्पो चालवणाऱ्या या माणसासोबत रहात होती आणि त्यांच्यात अधून मधून खूप भांडणं होत होती अशी माहिती या दोघांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीने दिली असल्याचं आणि पुढील तपास पोलीस करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.