देशभरातच भाजपचं सत्तांध वर्तन पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चेकाळल्यासारखे झालेय.

त्यात मोदींनी ही २०२४ ची आगाऊ सूचना आहे असं म्हटल्याने भाजपा कार्यकर्ते तर स्फुर्तिले, जोशीले झालेच. पण विरोधी पक्षातील खचलेले, आतून नाराज. सत्ताकांक्षी, अशा नेत्यांना मोदींचे हे एक प्रकारे आवतानच आहे! आमच्याकडे या, पावन व्हा सत्तेत सहभागी व्हा!

राष्ट्रीय स्तरावरील हा सत्तानंद राज्यस्तरीय भाजपामध्ये इतका शिरलाय की होळीत भांगेने बेहोश, बेभान होऊन बरळणाऱ्या उत्सवी टोळीचे स्वरूप त्याला आलंय. होळीत भांगेंचं बरळणं ‘बुरा मानो….’ म्हणून विनयाने त्या दिवशीची बेहोशी संपवली जाते. महाराष्ट्र भाजपमात्र या बेहोशी मोडमधून बाहेरच यायला तयार नाही. याआधी ते सत्तावंचित सैरभैर मोडमध्ये होते. फडणवीस केंद्री साम दाम दंड वापरूनही महाआघाडीत काहीच बिघाडी करता आल्याने स्वत: फडणविसांनीच संघ शिकवणीनुसार आक्रमण हाच बचाव या नितीतून थयथयाट सुरू केला. त्यात झिलकरी म्हणून चंद्रकांतदादा, आशिष शेलार, दरेकर, वगैरे मंडळी होतीच. शिवाय लग्नाच्या मांडवात पार्श्वसंगीत म्हणून सनई जशी अखंड वाजत असते तशी किरिट सोमय्यांची किरकिट धून वाजत राहते.

सत्ताधारी म्हणून जनतेने कौल दिलेला असताना सेनेने सक्षम विरोधी पक्षाची जागा दाखवली याचा सल भाजपला इतका खोलवर आहे की आता दोन वर्षात पुन्हा निवडणुका आल्या तरी ते सरकार पाडापाडीचे बाईटस पगारी माध्यमांमार्फत सतत प्रसारीत करत असतात. सत्ताधारी आमदार कधी राणेंच्या संपर्कात, तर कधी चंद्रकांतदादांच्या, कधी दानवेंच्या संपर्कात असतात. या तिघांच्या संपर्कातील आमदारांची बेरीज केली तर ती कदाचित २८८ सुध्दा होईल!

हिटलरच्या काळात तयार झालेली प्रपोगंडा मशिनरीचं मॉडेल संघ भाजप वापरत आलेत. यात एक असतं खोटं बोल, रेटून बोल वा खोटंच इतकं बोला की ते खरं वाटावं. प्रचार प्रसाराचा भाग म्हणून वापरायचं हे तंत्र भाजपाने आता बहुतेक धोरण म्हणूनच स्विकारलंय.

भाजपचं सगळं शिस्तीत असतं, त्यामुळे त्यांच्या उन्मादातही एक शिस्त अनुक्रम असतो. उदा. फडणवीसांनी काय बोलायचं, चंद्रकांतदादांनी काय पसरवायचं, शेलारांनी कुणाला आव्हान द्यायचं, दरेकरांनी कुठली प्रतिक्रिया द्यायची, राणे पितापुत्रांनी कधी बोंब मारायची आणि सोमय्यांनी गाळलेल्या जागा कधी भरायच्या हे सर्व लिखित संहितेसारखं अलिखितपणे घडतं

यातून काय होतं, माध्यमं व्यस्त राहतात त्यातल्या ८०% अवकाशात भाजप एके भाजप चालू असतं. अजीर्ण व्हावं इतकं हे चर्वितचरण असतं पण प्रेक्षकांना हे अजिर्ण होऊ देणं हा सुद्धा रणनितीचाच भाग असतो! कारण अजिर्ण झालेला माणूस कुटुंबात जितका लक्षवेधी ठरतो तेवढा निरोगी माणूस नाही ठरत!

सध्या भाजपाला नवाब मलिकांच्या निमित्ताने आपला खास आवडता हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा अजेंडा जोरात राबवता येतोय. फडणवीसांनी सरळच म्हटलंय की हे दाऊद समर्पित सरकार आहे! फडणवीसांचे पूर्वसूरी मुंडे-महाजन यांनी नव्वदच्या दशकात शरद पवार यांच्याशी दाऊदच्या संबंधाची राळ उठवली होती आणि सत्तेत आल्यावर दाऊदला फरफटत आणण्याची राणाभीमादेवी घोषणा मुंडेंनी केली होती. त्यानंतर युती सरकार आले, मुंडे स्वत: गृहमंत्री होते, केंद्रातही भाजपप्रणित सरकार होतं. पण त्या पाच वर्षात काहीच घडलं नाही. उलट मुर्शरफ यांनी कारगिल वर चढाई केली. नंतर आग्रा परिषद अर्धवट सोडून गेले. याच काळात कंदहार विमान अपहरण प्रकरण घडले पाच मोस्ट वाँटेड अतिरेक्यांना काश्मिर तुरूंगातून कंदहारला सोडायला संरक्षणमंत्री जसवंत सिंह गेले होते. दीड दोनशे प्रवाशांच्या जीवितासाठी ही तडजोड केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे दाऊद या विषयावर नव्वदच्या दशकात राज्यात केंद्रात सत्तेत असलेल्या आणि आता २०१४ पासून पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेत असलेल्या सर्जिकल स्ट्राईक एक्सपर्ट मोदी सरकारने काय केले?

याउलट जगाची पर्वा करता अमेरिकेने लादेनला पाकिस्तानातून उचलून थेट जलसमाधी दिली! त्याचे पुरावे जगभरात डॉक्युमेंट्री तयार करून दिलेत. आपल्याकडे पुरावे मागणारे देशद्रोही ठरतात.

तिकडे ‘लादेन ऑपरेशन’ ओबामा शांतपणे मॉनिटर वर पहात बसतात. आपले पंतप्रधान ढगाळ वातावरणात विमाने रडारवर दिसणार नाहीत असा स्तंभित करणारा सल्ला सुरक्षा तज्ञ सैन्यप्रमुखांना देतात.असो.

भाजपाने मंत्र्यांच्या राजीनाम्यातही हिंदू मुस्लिम असा भेद करून त्यावरून जनमत चाळविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. हेच भाजपावाले नाक वर करून गुन्हेगाराला, अतिरेक्याला जात नसते, धर्म नसतो म्हणत असतात. मग मंत्र्याला जात धर्म असतो का?

भाजपने समाज माध्यमांवर जशा झुंडी केल्यात, तशा ते आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवू लागलेत. मलिकांच्या राजीनाम्याविरोधात राज्यभर आंदोलन समजू शकतो. हक्कच आहे. पण एका दखलपात्र गुन्ह्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून कायदेशीर बाब म्हणून फडणवीसांना जवाब नोंदविण्यासाठी बीकेसी पोलीस स्टेशनने नोटीस पाठवली. समन्स नव्हे. ही एक औपचारिकता होती. पण प्रदेश भाजपने बीकेसी पोलीस स्टेशन वर झुंडी नेण्याची तयारी केली. शेवटी पोलीस फडणवीसांच्या घरी गेले. उठसूठ कायदा, नितीमत्ता नी नियम यावर घसा ताणून बोलणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आजी विरोधी पक्षनेत्याला पोलीस प्रक्रियेची अपरिहार्यता कळू नये? त्याऐवजी पक्षाची झुंड पोलीस स्टेशन वर स्वत:आपण घरात! आघाडी सरकारने त्यांचा सन्मान राखला पण फडणवीस भाजपचा दिसला तो फक्त उन्माद!

आज कुणी भाजपच्या आमदार श्रीमती महाले म्हणाल्यात की, ‘नवाब मलिकांनी ९३ चे बाँबस्फोट घडवले.’ महाले मॅडमनी जरा श्रीकृष्ण अहवाल वाचावा. सध्या भाजपाच्या सावलीत फिरणाऱ्या उज्जवल निकमांना विचारावे की १३ वर्षे खटला लढवलात तरी तुम्हाला हा नवाब सापडला नाही त्यात? मग शिक्षा भोगताहेत, फासावर गेलेत जाणार आहेत त्यांनी नेमकं काय केलं? का पुढे येणाऱ्या कसाबसाठी बिर्याणी बनवत होते? शिवसेनाप्रमुखांनी निर्दोषत्व बहाल केलेल्या संजय दत्तवर तेव्हा भाजप का गप्प बसली? तरीही संजय दत्तला वर्षाची शिक्षा झालीच आणि मलिक कुणाच्या लक्षातही नाही आले? आमदार महालेंना राॅमध्ये ओएसडी म्हणून बोलवून घ्यावे मोदींनी. म्हणजे असे छुपे नवाब शोधता येतील पटापट.

 

शेवटी किरीट सोमय्यांनी एका केलेल्या आवाहनाबद्दल. न्यायालयाने अनधिकृत ठरवलेलं अनिल परब यांच्या रिसाॅर्टच्या पाडकामाचे आदेश येऊनही महाविकास आघाडी सरकार दिरंगाई करतंय, म्हणून सोमय्या २६ मार्चला, दापोलीवर मार्च काढून ती वास्तू जमिनदोस्त करणार आहेत! सरकारची दिरंगाई अक्षम्य पण सोमय्यांची कायदा हातात घ्यायची दांडगाई कुठल्या लोकशाहीत बसते? मग राणेंच्या बंगल्यातही अनियमितता अनधिकृत बांधकाम आढलले आहे. तेही पाडायच्या सूचना आहेत. मग सोमय्यांचा मार्च तिकडेही जाणार का?

उघडपणे व्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी, ठरविणारेच जेव्हा अशा कृती करतात सरकारपासून माध्यमांपर्यंत कुणीच त्यांना प्रतिप्रश्न करत नाही उलट बाईट भुकेले आदल्या रात्रीपासून सोमय्यांच्या घराखाली जाऊन उभे राहणार लोकशाहीसह चौथ्या खांबाच्याही फरफट यात्रेत सहभागी होणार. 

असे वातावरण राष्ट्रीय प्रदेश भाजपच्या अंगात शिरले तरच नवल!

 

संजय

पवार