वकील असलेल्या सदावर्तेंवर तर अजामीनपात्र गुन्हे नोंदवलेत. सदावर्तेंची पत्नीही वकील असल्याने, त्या पतीसाठी कायद्याचा किस पाडतील. पण इतर १०९ जणांचे काय होईल? विशेषत: त्यातल्या स्त्रिया, तरूण मुली यांचे. सोमवारी या सर्वांना पुन्हा कोर्टात उभे केले जाईल. सदावर्ते व हे कर्मचारी यांची रितसर विभागणी आत्ताच केलीय. त्यात प्राथमिक तपासात पोलिसांना या १०९ पैकी अनेकांनी खोटी, नावं, पत्ते दिलेत. त्यामुळे एस. टी. कामगारांच्या नावाखाली वेगळ्याच झुंडीने केलेला हा पूर्वनियोजित हल्ला होता असं पोलिसांचंच म्हणणं आहे.
पोलिसांचा हा दावा, संशय, निरिक्षण मान्य करायचे तर पवारांसारख्या नेत्याच्या घरावर पूर्वनियोजित हल्ला होतो व स्थानिक पोलिंसासह, गुप्तचर खात्याला त्याची गंधवार्ता नसते? त्यांच्या अक्षम्य हेळसांडीवर, कर्तव्यकसूरी बद्दल राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाल्यावर पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेतात आणि गाड्याबरोबर नळ्याची यात्रा काढावी तसे आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांना हुसकावून मैदान मोकळं करतात. कर्मचारी तिथून उठून सीएसटी स्थानकात जाऊन बसले. पोलीस आता तिथे कडं करून पहारा देताहेत!
सगळाच घटनाक्रम अतर्क्य, अविश्वसनीय व राज्याच्या पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर मांडणारा आहे. निषेधाच्या सार्वत्रिक सूरांशिवाय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची राज्यभरातील निदर्शनांनी चॅनलिय पत्रकारितेला चघळायला एक च्युईंगगम मिळालेय. पण विचारी जन आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची शैली अभ्यासणाऱ्या राजकीय विश्लेषकांना मात्र हा सर्वच प्रकार जसा दिसतो तसा वाटत नाहीये. प्रसंगातलं गांभिर्य तसंच ठेवूनही काहींना यात पवारांच्या राजकारणातील कात्रजच्या घाटाची आठवण आली. तर काहींना हा केवळ उत्स्फुर्त हल्ला न मानता व्यापक कटाचा भाग वाटतो. तर आंदोलकांचे मुखवटे घालून आलेले हे उग्रवादी नेमके होते कोण व त्यांचा उद्देश पवारांच्या निषेधापर्यंतच मर्यादित होता की वेगळा अजेंडाही होता?
या झुंडीचा आवेश, अभिनिवेश, आक्रमकता पाहता हा निषेध मोर्चा, घेरावाचा प्रकार होता असे वाटत नाही. विशेषत: चपलांचा वापर, त्याची कॅमेऱ्यात उपस्थिती दर्शवण्याची कसरत पाहता, सुपारीबाज जसे कामगिरी फत्ते केल्याचे संकेत देतात तशी वाटत होती. आदल्या रात्री कोर्टाच्या आदेशाचे स्वागत करणारे चेहरे व हे चेहरे यात कमालीचा फरक जाणवतो. शंभरात एखाद दुसरे कामगार असतील वा निवडक असे होते ज्यांनी शंभरांवर गारूड करून त्यांना व्यापक कटात गुंतविण्यात यश मिळवले असावे.
शरद पवार यांचा पेशन्स आजमितीस देशातला सर्वोच्च असावा. तरीही प्रत्यक्ष हल्लेखोरांना निर्भयतेने विनासंरक्षण सामोऱ्या गेलेल्या त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना ज्या पध्दतीने घेरण्यात आले होते, घरात ७५ वर्षाची पत्नी, तरूण नातवंडे होती. या सर्वांची सुरक्षा स्वत: पवारांसह वाऱ्यावरच होती. परिस्थिती काहीही अनुचित घडेल अशी स्फोटक होती. पण ठोका चुकविणाऱ्या या प्रसंगावरची पवारांची प्रतिक्रिया फारच संयत, किंचितही विचलीत न होता इतकी सविस्तर होती की वाटावे ते जनरल एका घटनेवर बोलताहेत! यावरही उलटसुलट चर्चा चालूच आहे. त्यानंतर पवार कुटुंबिय संध्याकाळीच पुण्याला रवाना झाले, या प्रवासाचे तपशील अर्थातच कुणालाच कळले नाहीत वा माध्यमांनी त्यांचा माग काढण्याचा अगोचरपणा केला नाही. यात आश्चर्य वाटले गॄहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांचे. त्यांनी खरं तर नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा होता. पण त्यांची नैतिकता महाआघाडी सरकारचे वाभाडे काढणारी ठरली असती! त्यामुळे गॄहमंत्र्यांनीही इतरांसारखी निॆषेधाची, सखोल चौकशीची व कडक शासन करू अशी शासकीय छापाची प्रतिक्रिया दिली!
आता चित्र असे उभे केले जातेय वा पोलीस तपास असे सांगतोय की हा हल्ला पूर्वनियोजित होता.
याचे सूत्रधार अॅड. गुणवंत सदावर्ते व काही लोकांनी ७ तारखेच्या रात्रीच हा कट रचला आणि तडीसही नेला. पवारांच्या मुंबई वा बारामतीच्या घरावर चाल करण्याचा हा कट होता!
पोलीस आता हे ही म्हणताहेत आम्हाला दुपारी तीन - सव्वातीनला सुगावा लागला पण मुंबई की बारामती हे कळेपर्यंत हल्ला झाला होता.
पवारांचं मुंबईतील घर मलबार हिल, पेडर रोड अशा उच्चभ्रू, श्रीमंत, मंत्री, प्रशासक, परदेशी दूतावासाचे लोक राहतात असा अतिसंवेदनशील भागात. तर बारामतीत मुंगीही पवार कुटुंबियांच्या नजरेखाली असते. अशा दोन्ही ठिकाणी थेट पवारांवर हिंसक हल्ला करण्याची हिंमत काल परवाकडे प्रसिध्दीस आलेल्या व लगेचच त्याला चटावलेल्या अॅड. गुणवंत सदावर्तेमध्ये असेल? स्वत:सह कुटुंबाचा विनाश स्वहस्ते करण्याची विपरित बुध्दी सदावर्तेंना झाली असेल? का या अतर्क्य कहाणीच्या लेखकांनी अॅड.गुणवंत सदावर्ते हे पात्र खुबीने हेरून त्याला हाकारत हाकारत शिकारीच्या टप्प्यात आणलेय? सरलेल्या विधानसभा अधिवेशनात गृहमंत्र्यांसह अनेकांनी सदावर्तेंना पटलावर आणले होतेच. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याला न्यायालयीन विरोध करणारे सदावर्ते तसेही अनेकांच्या हिटलिस्ट वर आहेतच. त्यात त्यांचे व त्यांच्या पत्नीचे आक्रस्ताळी वर्तन सर्व सामान्यांची सहानुभूतीही गमावून बसलेले. एसटी संपाबाबतही सदाभाऊ खोत व पडळकर यांनी सुरूवातीला उडी घेतली पण नंतर हळूच पतली गल्ली गाठली. त्यांनीही आता संप चिघळण्यास सदावर्तेच दोषी असा आरोप करत आपल्या गळ्यात आलेल्या आपल्याच तंगड्या सोडवल्यात!
एकंदर पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी आरोपी योग्य त्या पार्श्वभूमीसह सापडलाय. अडचण एकच आहे, आरोपी स्वत:च एक चतुर वकील आहे. पोलिसांतही त्याची चांगली उठबस असावी. न्याययंत्रणेतील आतील दुवेही ज्ञात असतील. एकंदरीत हा खटला रंजक होणार. यात आरोपी व फिर्यादी ठरवून हा खेळ हवा तसा खेळू शकतील.
दरम्यान नवनवीन घटना घडत राहतील, माध्यमांचे माईक पळत राहतील. नवी शिकार, नवे हाकारे तयार होतील व सिल्व्हर ओकचे गुपित सोन्याच्या पेटीत बंद होऊन त्याची चावी मलबार हिल मागच्या समुद्रात गडप होईल. विस्मरणाची नवी लाट येईल व स्थिर होईल.
संजय
पवार
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.