महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे लोकप्रिय नेतृत्व आजही आहे. तरूण,महिला व मध्यमवयीन मराठी माणसांत राज ठाकरे नावाची जादू आजही काही धुगधुगी निर्माण करते.
पक्ष स्थापनेनंतर लगेचच १३ आमदार, प्रमुख महापालिकांमध्ये दोन आकडी नगरसेवक, नाशिक महापालिकेत सत्ता असे अनेक विक्रम आजही त्यांच्या नावांवर आहेत,
पण त्याच बरोबरीने वेगाने या सर्वाची घसरण असाही विक्रम त्यांच्या नावे जमा आहे. तरीही राज ठाकरे बोलणार म्हणजेच गर्जणार म्हटल्यावर वृत्तवाहिन्यांची किमान दोन तास विक्रमी टीआरपीची सोय होते. तशीच ती शनिवारी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याने यंदाही झाली. कोरोना निर्बंध हटल्यानंतरचा हा मुंबईतला पहिलाच मेळावा! मध्यंतरी राज यांनी पुण्यात एक सभा केली, पण तो टिझर होता, पिक्चर पाडवा मेळाव्यात अशी त्यांनीच राजगर्जना केली असल्याने, पाडवा मेळाव्याची उत्सुकता उभ्या आडव्या महाराष्ट्राला होतीच.
पण या उत्सुकतेला योग्य ती फोडणी देण्यात राज ठाकरे अयशस्वी ठरले असेच म्हणावे लागेल. मैफिलीची वातावरण निर्मिती उत्तम असावी, श्रोतेही तुडूंब गर्दीने उपस्थित असावे, मंचावर एक सळसळ असावी. गवई येताच चैतन्य पसरावे. त्याने बैठक मारताच श्वास रोखले जावेत पण पहिलाच सूर खालचा लागावा आणि नंतर तो वर उचलण्याच्या प्रयत्नात सूर भटकतच जावा तसं परवाच्या मेळाव्याचं झालं. सोशल मीडियावरही “जिंकलंत साहेब!” असा निर्विवाद कौल आला नाही. मनसैनिकांना नाराजी व्यक्त करायला वावच नसतो.(तसा तो कुठल्याच पक्षात नसतो) पण सर्वसामान्य लोकांतही ५०% पसंतीच मिळाली भाषणाला. माध्यमांना भोंग्यापलिकडे फारसं चटकदार, धारधार काही हाताशी लागलं नाही.असं का झालं असावं?
स्वत: राज ठाकरे म्हणाले तसं, “दोन वर्षाची तुंबलेली मोरी, तिचा नेमका बोळा कुठून काढावा,” तशी दोन वर्षानंतरच्या या पहिल्या थेट संवादावेळी त्यांची पंचाईत झाली. ते पुढे असेही म्हणाले की, “खूप कागद आणले होते, विषय मांडायसाठी,” पण…. आणि... मग लगाम सुटला भाषण विस्कटलं, त्यात ते जोश भरायचा प्रयत्न करत होते पण सुरूवातच त्यांनी लोक विसरलेल्या २०१९च्या महाराष्ट्रातल्या सत्तांतरापासून केली आणि ते “आज”पासून जे तुटत गेले ते इतके की नंतर शिवसेना, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यावरच घसरले! मनसैनिकांसह सर्व मराठी जनता राज ठाकरे मनसेची पुढची वाटचाल, सध्याचे महागाई, रोजगाराचे प्रश्न, केंद्र राज्य तणाव, राज्यपालांचा आडमुठेपणा, चित्रपट, वेशभूषा, खाणे, पिणे यावरून धार्मिक धृवीकरणाचे वाढते हिंसक संकट या व अशा अनेक विषयांना बाजूला सारत ते उध्दव ठाकरेंवर घसरले. शरद पवारांना जातीयवाद पेटविणाऱ्यांचे मेरूमणी ठरवून मोकळे झाले. विस्मॄतीत गेलेला जेम्स लेन उकरून काढला. बाबासाहेब पुरंदरे वरून इतिहासावर बोलले. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी समोरच्या विशाल जनसागराला २०१९ मध्ये नेलं आणि मग ते तिथेच अडकले!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भले मोठे एलसीडी पडदे लावून, ‘लाव रे तो व्हिडीयो’ म्हणत मोदी-शहा जोडीची पोलखोल करणारे, त्यांच्या खोटेपणाचे पुरावे देणारे राज ठाकरे २०१९ च्या विधानसभेनंतरच्या राजकारणावर बरसले पण त्याआधीच्या सहा महिन्यांपूर्वीचं स्वत:चंच डिजिटल धुमशान विसरले! जे राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनीही भाषांतर करून दाखवले होते. त्यांना त्याचा इतका विसर पडला की या मेळाव्यात त्यांनी भाजपाचा ‘भा’पण नाही उच्चारला! इतकंच काय मोदी, शहा, फडणवीस हे राजकारणात नाहीतच जणू इतके त्यांना भाषणात बेदखल केले. हे बेदखल करणे हा पुढच्या राजनितीचा भाग आहे? भाजप सेनेची हिंदुत्वावरून कोंडी करत असताना राज यांना मराठी हृदयसम्राटांसोबत हिंदू हृदयसम्राटही व्हायचेय?
राज ठाकरेंना त्यांचं राजकारण करण्याचा, ते पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे पण तेही आता भाजपने सेट केलेल्या धार्मिक धृवीकरणाच्या अजेंड्याच्या जाळ्यात फसत चाललेत. यातूनच मशिदीवरचा भोंगा, बेहरामपाडे, मदरसे हे विषय त्यांनी मुस्लिमांबद्दल द्वेश, संशय वाढेल अशा पध्दतीने रंगवून सांगतानाच मशिदीवरील भोंग्यास स्पिकरच्या भिंती उभारून हनुमान चालिसा जोरात वाजविण्याचे आदेश दिलेत. हे म्हणजे मूळ अवेळी होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कायदेशीर वा सामाजिक सौहार्दाचे प्रयत्न सोडून ‘भला तेरी आवाज मेरी आवाजसे ज्यादा बडी कैसी?’ असला हमरीतुमरीचा मामला गल्लोगल्ली वाढविण्याचाच प्रयत्न. यातून शांततेच्या शोधातला हिंदू म्हणेल ती बांग परवडली पण तुझी चालिसा आवर!
शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात जातीयतेचे विष पेरणारे म्हणून दोष देणाऱ्या राज ठाकरेंनी पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांची जाहीर मुलाखत घेतली होती.तेव्हा त्यांच्या प्रश्नावलीत हा जातीयतेचा, मराठा आरक्षण, जेम्स लेन, पुरंदरे हे विषय का नव्हते? का औचित्यभंग होऊ नये म्हणून गुण गाईन आवडीने अशी शपथ घेतली होती?
उध्दव ठाकरे व त्यांची शिवसेना, सत्तेचे राजकारण भूमिकांची अदलाबदल यावर बोला, राजसाहेब. पण शेवटी तो त्यांचा राजकीय व्यवहार आहे. तुम्ही पक्षाचा ध्वज बदलला, निवडणूक चिन्ह डावी उजवीकडे फिरवले, यावर कुणी काही बोललं? आश्चर्य म्हणजे फडणवीस - अजित पवार यांचे काही तासांचे विधिनिषेधशून्य राजकीय स्वयंवर लावणारे राज्यपाल यावर या तिघांची हजेरी न घेता साधा नामोल्लेखही टाळत एक चापटी मारल्यासारखा विनोद करून तो प्रसंग विसरून पुन्हा सेना राष्ट्रवादीवर अकारण वेळ घालवत बसले. साधारण तासाभराच्या भाषणात केंद्रीय व राज्यस्तरीय भाजपाच्या राजकारणावर पांघरूण घालत, त्यांच्याच नवहिंदुत्वाच्या अजेंड्याच्या पावलावर पाऊल ठेवत, मनसैनिकांना, ना मराठी जनांना या विटलेल्या राजकारणात माझा पक्ष कसा परखड राहून लोककल्याणाचे लोकशाहीपुरस्कृत राजकारण करील असा नवा ताजा कार्यक्रम दिला असता तर लोकांना प्रस्थापित सत्ताधारी व विरोधी पक्षाला “आप” सारखा पर्याय मनसेत सापडला असता. पण राजगर्जनेत नवी तुतारी न वाजता जुनीच पिपाणी पिचकटली!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शिवजयंतीप्रमाणे उत्साहाने साजरी करा या शेवटाचे नेमके काय करायचे हा गोंधळ मनात घेऊन मनसैनिकांचा पाडवा पार पडला!
संजय
पवार
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.