हा देश २०१४ साली स्वतंत्र झाला, असं म्हणणारे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षात जेव्हा पद्मांकित झाले, तेव्हांच हा देश कुठे नेऊन ठेवायचाय हे कळले होते. 

सुमारांची सद्दी होते आणि माकडांच्या हाती कोलीत मिळते तेव्हा समाज एकतर प्रक्षुब्ध, हिंसक खुनशी होतो, तसाच हतबलही होतो.लंबकाची ही दोन टोके सर्व समाजस्वास्थ्य बिघडवून टाकतात.आणि हे जेव्हा ठरवून केले जाते तेव्हा अराजकाला सस्नेह निमंत्रणच मिळते.

देशातील आणि महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण म्हणजे तवा चुल्ह्यावरच म्हणता येईल. पण जे शिजणार आहे ते पोटाची खळगी भरणारे घामाचे चार घास नसणारायत, तर मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी खरपूस भाकरी भाजली जातेय. पेटवापेटवीची भाषा, पराकोटीचा विद्वेष आणि निलाजरा उन्माद यातून सत्तेचे राजकारण करताना त्याला धर्मयुध्दाची फोडणी, इतिहासाचा लाव्हा आणि आधुनिक तंत्र विज्ञानाचा वापर करून सामूहिक माथेफिरूपणा भिनविण्याची कुटील नीती वापरली जातेय, ती ही खुलेआम लोकशाही आणि संविधानाच्या शपथा घेत!

लालूप्रसाद यादव यांनी भाजपा म्हणजे भारत जलाओ पार्टी असे जे म्हटले होते ते किती समर्पक होते हे आज कळू शकते. दहशतवादी, नक्षलवादी अशा हिंसेच्या तत्त्वज्ञानावरच पोसलेल्या गटांचा हिंसाचार दृश्यमान असतो वा तसा त्याचा प्रचार प्रसार असतोपण लोकसभेच्या पायऱ्यांवर मस्तक टेकवायचे, संविधानाची प्रत पोथी प्रमाणे भाळी लावायची. आणि खाणे, पिणे, पेहराव, भाषा, जात, धर्म यावरून खाजवून खरूज काढावी तसे निमित्त शोधून हिंसाचार भडकवायचा. शक्य तिथे तो सरकारी निगराणीत पोलिसी न्यायव्यवस्थेसह आश्वासित राहिल हे पाहत सत्तेच्या शिर्षस्थ नेतृत्वाने सोयिस्कर मौन धारण करायचे हे नवे तंत्र आहे, हा नवा मंत्र आहेदोन दशकांपूर्वी एका राज्यात राबवलेला प्रयोग आता देशभर राबवला जातोय कारण देश स्वतंत्र होऊन सातच तर वर्ष होताहेत. या नव्या स्वातंत्र्याची जी रूपरेषा त्यावेळी तयार झाली त्याचा अंमल आता होतोय टप्प्याटप्प्याने!

पाच राज्यात विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले. तो हिंदूराष्ट्रासाठीचाच कौल समजून आता येणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांसाठी थेट त्या राज्यात वा आसपास पुन्हा धृवीकरणाचे खेळ सुरू झालेत. इतकी वर्षं रामनवमी हनुमान जयंती येत असे वा जात असे. रक्षाबंधन वा नागपंचमी येते नी जाते तसेच. पण यंदा या दोन उत्सवांनी देशातील वातावरण उन्मादाकडून अराजकाकडे नेले. वास्तविक राम मंदिराचा प्रश्न सुटलाय. मंदिर निर्माणाचं काम हिंदुत्ववादी केंद्र राज्य सरकारच्या देखरेखीखाली नियमितपणे चालू आहे. त्यामुळे रामभक्तीचा महापूर मंदिर पूर्ण झाल्यावर येऊ शकतो तेव्हा अयोध्येत भव्य रामसंकुल तयार असेल. ९२ पासून राजकीय पटलावर आलेल्या मंदिर आंदोलनात कधी हनुमान जयंती परवासारखी वादग्रस्त झाली नाही. मग आत्ताच का? ते ही उत्तर प्रदेशच्या बाहेर? आणि याच पध्दतीने हिंदू देवदेवतांच्या जन्मसोहळ्यांना ठाशीव करत गेलो तर वर्षाचे ३६५ दिवस दिवसरात्रीचे २४ तास कमी पडतील. कारण ३३ कोटी देव असणाऱ्या शिवाय जात पोटजातीचे देव देवी, कुलदैवते यासर्वांचा विचार केला तर कामधंदे सोडून तेच करत बसावं लागेल.

खरं तर सश्रध्द हिंदू हे नित्यनेमाने करतच असतो. घरात करतो. वाटेत नाका, चौक वा विशिष्ट ठिकाणच्या देवळात जाऊन तो भक्तीभाव पार पडत असतो. अगदी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरकारी संगणकाचा वॉलपेपर गणपती, साईबाबा, कुलदैवतं यानेच सजलेला असतो. त्यांना कुणीही हटकत नाही. मोबाईल हेडफोन कानात लाऊन गायत्री मंत्र, गण गणात बोते वगैरे लोक ऐकतच असतात. एकमेकात प्रसाद वाटप करत असतात. थोडक्यात सश्रध्द हिंदू संविधानाच्या सर्वधर्मसमभावाने त्याच्या पूजाअर्चाच काय कर्मकांडापासूनही वंचित राहिला नाही. सरकारी कार्यालयात सत्यनारायणाची महापूजाही केली जाते. हिंदू देव देवतांचे फोटो पोलीस स्टेशनमध्ये सुध्दा भिंतीवर विराजमान असतात. उद्या तिथे एखादा मुसलमान अधिकारी मक्केचा फोटो वा ख्रिश्चन अधिकारी येशू वा मेरीचा फोटो लावू शकेल? शिख गुरू नानकांचा फोटो लावू शकतो बौध्द अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तसबीर साभिमान लावतात कुणीच काहीच बोलत नाही! कारण हे दोन समुदाय सॉफ्ट टार्गेट नाहीत!

प्रश्न नेहमी हा पडतो की, हिंदूंच्या मिरवणूक रस्त्यावर कायम मशिदच कशी येते? चर्च, गुरुद्वारा वा बौध्द विहार कसे काय नसतात? का असले तरी त्यांना या वाद्यांचा त्रास होत नाही? मग मुस्लिमांचाच का होतो? आणि होतो तर त्यांची विनंती असते तेवढ्यापुरते वादन नर्तन थांबवाइतकी वर्षं ते पाळले जात होते. पण आता मुद्दाम भांडण उकरून काढले जाते. मग दोन्हीकडचे माथेफिरू शांततेचे सर्व प्रयत्न फोल ठरवतात दंगा सुरू होतो. या नवहिंदुत्ववादाला मुस्लिमांनी आता पारंपरिक पध्दतीने नव्हे तर गांधीगिरीने उत्तर द्यायला हवे. त्यांना वाजवू, नाचू द्यावे. सुरूवातीला खिजवून जोरात करतील पण विरोध नाही म्हटला की उन्मादही ओसरेल. भोंग्यांबाबत मुस्लिम विचारवंत, समाजधुरिणांनी कोर्ट आदेश पाळण्यासाठी पुढाकार घेतलाय. तो स्वागतार्ह आहे. खरं तर गावखेड्यात राहणारा देशी मुसलमान हिंदूंच्या सर्व यात्रा, जत्रा, नवसफेडाफेडी, ऊरूस, दर्गे, यासह गुलालाने वगैरे माखतो. हिंदूंनाही तो चालतो. ही देशीयता नवहिंदुत्वाच्या कृतक राष्ट्रवादापेक्षा अधिक देशप्रेमी आहे 

पण नवश्रीमंत, नवहिंदुत्ववाद्यांना आपल्या ब्राह्मणी धर्मसत्तेची पुनर्स्थापना करण्यासाठी एक काल्पनिक शत्रू म्हणून मुस्लिम विरोधाची धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे आक्रमकपणे वापरता येते. दुर्दैवाची गोष्ट ही की, ज्या अठरापगड जातीजमातीचे मावळे स्वराज्यासाठी लढले त्यांनाच ओबीसी प्रवर्गातून गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपतींची प्रतिमा पूजायला लावून मुस्लिमांविरोधात दंग्यासाठी उसकवले जाते. देशात कुठेही बघा चिथवायला उच्च जाती लढायला, दंगे करायला ओबीसी आदिवासी. मरणार तेच, खटल्यातही तेच अडकणार. बाबरी पाडताना शहिद झालेल्या त्या दोन बंधूंची आठवण आज कुणाला आहे? त्यामुळे शंभर वर्षापूर्वी शाहू महाराज म्हणाले होते की, इंग्रजांना हटवून येणाऱ्या स्वातंत्र्याचे नेतृत्व जर सनातनी वैदिक ब्राह्मणांच्या हाती जाणार असेल तर ते चालणार नाही. कारण यांनीच जातीभेदाची, अस्पृश्यतेची कुप्रथा आणली. यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून राज्याभिषेक केला नाही. राजर्षी शाहूंच्या या भूमिकेचे खंदे पाठीराखे होते प्रबोधनकार सीताराम केशव ठाकरे!

आणि आज काय काळ आला आहे पहा, त्यांचेच नातू ब्राह्मणी हिंदुत्वाला शरण जात चौकाचौकात हनुमान चालीसा म्हणताहेत! ते ही पुण्यात! जिथे प्रबोधनकारांची गाढवावरून धिंड काढली होतीम्हणजे पुन्हा नवश्रीमंत, नवहिंदुत्ववादी सनातन धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी थेट प्रबोधनकारांच्या वारसांहातीच मुस्लिम विद्वेषाची मशाल देऊन देशात फाळणीपूर्व वातावरण तयार करताहेत!

 

संजय

पवार