१६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
उदगीर – महात्मा बसवण्णांच्या लिंगायत चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या उदगीर मध्ये यंदा २३ आणि २४ एप्रिल रोजी १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रख्यात कवी गणेश विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानावर हे संमेलन होणार असून संमेलननगरीला ‘महात्मा बसवण्णा वचनसाहित्य नगरी’ हे नाव दिले आहे. या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका मंगळवारी लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. अंजुम कादरी आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी जाहीर केली. अनेकविध महत्वाच्या विषयांवर संमेलनात परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला |
- २२ तारखेला संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या प्रबोधनपर नाटकाने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे.
- २३ तारखेला सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रेला सुरुवात होईल.
- नंतर अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाहचे प्रमुख सुफी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुफी विचारवंत सरवर चिश्ती यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल.
- अ.भा. मराठी साहित्य संमेलनात गोव्याच्या एका साहित्यिकाला बोलावण्यावरून वाद झाला त्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलनात प्रभाकर ढगे व शैलेंद्र मेहता या गोवास्थित मराठी-कोकणी साहित्यिकांना आमंत्रित केले आहे. सांस्कृतिक बहुविधतेचा सन्मान, बहुभाषिकांचा आदर, संविधानाचे समर्थन आणि सनातनवादाला विरोध या चतुःसुत्रीवर हे १६ वे विद्रोही साहित्य संमेलन उभे राहणार आहे.
- म. फुले रचित सत्याचा अभंग, कबीराचा दोहा, आंबेडकरी शाहीर वामनदादांचे मानवगीत आणि आदिवासी लोककलावंत अमृत भिल्ल यांच्या पावरी वादनाने विद्रोही मराठीचा सोहळा सुरू होणार आहे. प्रसिध्द पुरोगामी शेतकरी नेते रंगा राचुरे, तत्वज्ञ संपादक डॉ. नागोराव कुंभार, सामाजिक कार्यकर्ते रामराव गवळी व अंधश्रध्दा निर्मुलनाचे सत्यशोधक माधव बावगे या चार जणांना यावर्षीचे विद्रोही जीवनगौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.
- यावर्षी विद्रोही विलास सरवदे यांचे शिल्पप्रदर्शन, डॉ. सुनिल अवचार, सुधारक ओलवे यांचे कोरोना लॉकडाऊन आणि कष्टकरी हे चित्रप्रदर्शन डॉ. अनंत राऊत यांचे संविधान संस्कृती पोस्टर प्रदर्शन, गौतम निकम यांचे खानदेशातील आंबेडकरी योध्दे हे छायाचित्र प्रदर्शन आणि एड. अब्दुल्ला काद्री यांचे "ऐतिहासिक उदगीर" हे छायाचित्र प्रदर्शन असणार आहे.
- साहित्य संस्कृती माध्यमे यावरील पाच परिसंवाद, विविध सामाजिक राजकीय विषयांवरील सोळा गट चर्चा होणार आहे. तीन एकपात्री प्रयोग, झुंड चित्रपटात रॅप सादर केलेल्या ‘रॅपटोली’ या ऑर्केस्ट्रा सादर करणाऱ्या तरुणांचे सादरीकरण, महानाट्य यशोधरा, शिवाजी अंडरग्राऊंड ही दोन नाटके, एक भारुड या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल विद्रोहीत आहे.
- राजेंद्र कांबळे, एन डी राठोड, संजय घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कवी संमेलन होईल. तर दुसरे निमंत्रीत कवी संमेलन विख्यात कवियत्री डॉ. प्रतिमा अहिरे, अंकुश सिंदगिकर व प्रा. प्रशांत मोरे या मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली होईल. या दोन्ही कवी संमेलनात महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील ९० नामवंत कवी सहभागी होणार आहेत.
- मुख्य मंचावर ‘सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि बहुविधता" या विषयावर डॉ. मारोती कसाब यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यानंतर ‘महामानवांची बदनामी – इतिहासाचे विकृतीकरण’ या विषयावर संध्या नरे-पवार, सरफराज अहमद, अभिनेते किरण माने, डॉ. श्रीमंत कोकाटे या इतिहास संशोधकअभ्यासकांचा इतिहासज्ञ अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.
- सावरकरांचा पर्दाफाश, गांधी आणि नेहरु, कश्मिरी पंडीत - सत्य आणि विपर्यास या ग्रंथांचे लेखक, वादग्रस्त विचारवंत आणि ‘कश्मीरी पंडीतांच्या प्रश्नाचे’ आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. अशोककुमार पांडे यांची विशेष मुलाखत होणार आहे.
- ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांच्या अध्यक्षतेत "एकाधिकारशाही आणि माध्यमांचे ऱ्हासपर्व" या विषयावर डॉ. राजेंद्र गोनारकर, अलका धूपकर, प्रभाकर ढगे, दत्ता कानवटे, नचिकेत कुलकर्णी इ. नामवंत पत्रकार, माध्यम तज्ज्ञ भाग घेणार आहेत.
- सामान्य वाचक, रसिकांना आपले म्हणणे मांडता यावे व व्यापक वैचारिक संवाद व्हावा यासाठी शिक्षण, राजकीय भोंगा, अंधश्रध्दा, नागरीकत्व, एनआरसी, शेती, भटके विमुक्त प्रश्न अशा सोळा सामाजिक व राजकीय विषयांवर गटचर्चा होणार आहेत. या गटचर्चेत संमेलनाला उपस्थित सामान्य रसिक सहभागी होऊ शकतील.
- सभामंडप क्र. २ येथे मुक्ता साळवे बालमंचावर, शहीद भगतसिंग युवामंचावर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होईल. तसेच ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरील परिक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. त्यासाठीची व बालमंच, युवा मंच यावर कार्यक्रम करण्यासाठी नाव नोंदणी २१ तारखे पर्यंत चालू आहे.
- समारोपाचा कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशींच्या अध्यक्षतेत सन्माननीय कवी विख्यात सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते समारोप होणार असून एन.डी.टी.व्ही.चे ख्यातनाम संपादक रविशकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले (९४२२०१५८५४) व संमेलनाचे संयोजक अहमद सरवर (९४२३३५१४४७) यांनी दिली आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.