राजस्थान पाठोपाठ उत्तर प्रदेशात लहान दलित मुलीवर अत्याचार. 

राजस्थानच्या जालोरमध्ये वर्षाच्या इंद्र मेघवाल या मुलाला उच्च वर्णीय शिक्षकाने मारल्याने त्याच्या मृत्यूची, सीमा पात्रा या बीजेपी महिला विंगच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्येने आपल्या मोलकरणीवर अनन्वित अत्याचार करण्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातील फिरोजपुर जिल्ह्यातील तुन्डला तालुक्यातील सालेमपूर गावातील एका प्राथमिक शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या दलित मुलीला मारल्याची घटना घडली आहे. तिच्या शिक्षकांनी तिला इतकं मारलं की तिचा उजवा हात तुटला. सदर घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली आहे.

गुड्डू पंडित असं ह्या शिक्षकाचं नाव असून त्याने तिला इतकं मारलं की तिचा हात फ्रॅक्चर झाला. ती रडत घरी आली तेव्हा तिचे वडील सुनील कुमार यांनी लागलीच डॉक्टर कडे नेऊन तिच्या हाताला प्लास्टर केलं. मुलगी ठीक आहे. पण त्यानंतर सुनील कुमार आणि त्याची पत्नी हे शाळेत गुड्डू पंडित या शिक्षकाला नेमकं काय झालं हे विचारायला गेले असता मुलीची काय चूक झाली म्हणून त्याने मारलं  हे सांगता तो त्यांना जातीवाचक शिवीगाळ करू लागला. एवढंच नाही तरतुम्हाला जे काही करायचं ते करा, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही,’ असं म्हणाला आणि त्याने सुनील कुमार आणि त्याच्या पत्नीला धक्के मारत घालवून दिलं.

सुनील आणि त्याची पत्नी ह्या घटनेची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेले पण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही. शेवटी सुनील कुमार एसडीएम कार्यालयात गेले आणि त्यांनी तिथे तक्रार नोंदवली तेव्हा पचोखरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर रजिस्टर केली गेली. गुड्डू पंडित याच्यावर आयपीसीचे कलम ३२३ (दुखापत करणे) ३२५ (गंभीर इजा करणे) ५०४ (शांती भंग करण्याच्या विचाराने अपमान करणे) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण संशोधन (Prevention of Atrocities) अधिनियम २०१५ अंतर्गत तक्रार नोंदवून त्य आला अटक करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारा आणि जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतात २०२२ च्या ऑगस्ट महिन्यातच अत्याचाराच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. यात सर्वात मोठी घटना म्हणजे राजस्थानच्या जालोरच्या शाळेतील उच्च वर्णीय शिक्षकांनी पाण्याच्या मडक्याला हात लावला म्हणून इंद्र मेघवाल ह्या वर्षांच्या मुलाला २० जुलै रोजी बेदम मारलं. बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण अनेक दिवस उपचारांची पराकाष्ठा करूनही तो वाचू शकला नाही. १४ ऑगस्ट म्हणजे अमृत महोत्सवाच्या पूर्व संध्येलाच ७५ वर्षात आपण जातीयतेच्या बाबतीत कुठे आहोत हे इंद्रच्या मृत्यूने दाखवून दिलं. पण त्याच्यावर झालेल्या या अन्यायाची माहिती सबंध देशाला झाली ती त्याच्या निधनानंतर. अर्थातच त्यानंतर वातावरण तापलं आणि राजकारण सुद्धा.



सीमा पात्रा या बाई बीजेपी महिला विंगच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेतच शिवाय त्यांचे पती महेश्वर पात्रा हे माजी आयएएस अधिकारी होते. महिला विंग चालवणाऱ्या या बाईने आपल्या मोलकरणीला दाग देणे, तिचे दात तव्याच्या फटक्याने पडणे एवढेच छळ केले नाही तर तिने मोलकरणीला शौचालय जिभेने साफ करायला लावलं. माणूस कितीही कोणावर रागावला तरी इतक्या खालच्या पातळीवर जाईल? पण ह्या बाई त्या पातळीवर गेल्या. ह्याला विरोध करणारा आपला मुलगा आयुष्यमान पात्रा याला वेड्याच्या इस्पितळात पाठवलं होतं. शेवटी त्याच मुलाच्या तक्रारी नंतर ह्या बाईला अटक झाली.महिला विंग सदस्य पदावरून त्यांची हकालपट्टी आधीच झाली होती. पण अशी मनोवृत्ती खूप फोफावते आहे हे एकाच महिन्यात आपल्याला कळून चुकलं आहे.


इंद्र मेघवाल या अवघ्या वर्षांच्या मुलाशी अशी काय दुष्मनी होती की तो शिक्षक आपला शिक्षकी पेशाच नाही तर माणुसकीही विसरला! इंद्रच्या मृत्यूने आपल्या समाजात ह्या २१ शतकात सुद्धा किती बुरसटलेले विचार असलेले लोक वावरत आहे हे लक्षात आलं शिवाय माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही ही वृत्ती दिवसेंदिवस बळावत असल्याचंही प्रकर्षाने जाणवत आहे. ही मनोवृत्ती अशीच वाढत राहिली तर महासत्ता सोडा एकसंध राष्ट्र तरी हा महान भारत राहिल का हा प्रश्न पडतो आहे.