तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवल्या...

शाळेतले दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्ण काळच असतो. माणूस वयाने आणि लौकीकाने कितीही मोठा झाला तरी शाळेची उणीव कशानेच भरून निघत नाही. शाळेच्या बाजूने जाताना सुद्धा अनेकांच्या मनात आठवणींचे अनेक तरंग उठत असतात. पुन्हा नव्याने ते क्षण जगण्याचे वेध मनाला लागलेले असतात. मग जेव्हा असे सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांच्या भेटीच्या ओढीने पुन्हा एकदा एकत्र येतात तेव्हा गतकाळाच्या आठवणींना बहर येणारच! मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील परांजपे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच असा एक पुनर्मिलन स्नेह संमेलन सोहळा आयोजित केला होता. जुनी एसएससी जेव्हा अकरावी होती त्यावेळचे म्हणजेच जवळ जवळ ४८ वर्षांपूर्वीच्या बॅचचे ह्या शाळेचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले आणि आज वयाच्या सत्तरीत आणि नव्वदीत असलेल्या त्यांच्या त्यावेळच्याच गुरूजनांच्या उपस्थितीत हे पुनर्मिलन स्नेहसंमेलन पार पडले.

हे स्नेहसंमेलन हॉटेल कार्ल रेसिडेन्सी, लल्लुभाई पार्क, अंधेरी पश्चिम येथे सकाळी ११ ते .३० या वेळात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गुरूवर्य उमा सुरेश जोगळेकर मॅडम, त्यांचे पती डॉ. सुरेश जोगळेकर, शशिकांत जुन्नरकर सर, शुभांगी श्रीकांत बेडेकर मॅडम, अनुराधा कमलाकर बुवा मॅडम, त्यांचे पती कमलाकर बुवा, परांजपे विद्यालयाचे कार्यालयीन निवृत्त अधिक्षक सुरेश परांजपे उपस्थित होते.

सर्व गुरुजनांना शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ मिठाई पुडा देऊन विद्यार्थांच्या हस्ते सन्मानित  करण्यात आले. यानंतर अमिता प्रभू-पै, मिलिंद जाधव, अनंत दाभोळकर, अनिल खवणेकर, संदिप कामत, सुनील कांबळे, श्यामसुंदर मुणगेकर, निर्मला परब-शेट्ये या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आपल्या कडु गोड आठवणींनी कार्यक्रमाला चार चांद लावले. उमा जोगळेकर, शशिकांत जुन्नरकर सर, अनुराधा बुवा, शुभांगी बेडेकर या  गुरूजनांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.

विद्यार्थ्यानी ४८ वर्षापूर्वीच्या काळातील आठवणी सांगितल्यामुळे तो काळ पुन्हा एकदा जगलो अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. आपल्या ह्या माजी विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुकही केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अशोक घाडगे यांनी आपल्या जीवनात दारूमुळे झालेली परवड त्यातून आपण कसे सावरलो ह्याच्या हृद्य आठवणी सांगितल्या आणि श्रोतृवर्ग हेलावून गेला! दारू - अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस यावर त्यांनी माहिती दिली. सुरेश परांजपे यांनी एकपात्री नाटकांचे सादरीकरण केले. यावेळी उमा जोगळेकर मॅडम, तसेच माजी विद्यार्थी अनिल खवणेकर, सीमा हजारे-समेळ, चंद्रकांत लोटणकर, प्रकाश कदम, सुनील पवार, मंगेश कोळथरकर, नितीन कर्णिक, यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.

कार्यक्रमास स्मिता सावंत-मोरजकर, सीमा हजारे-समेळ, निर्मला परब- शेट्ये, दिलीप लेले, सतीश मोरे, चंद्रकांत लोटणकर, विलास पाटणकर, सुरेंद्र मोरजकर, संजय परूळेकर,अनंत दाभोळकर, अनिता अनंत दाभोळकरसुनील पवार, वर्षा मिलिंद जाधव, अशोक घाडगे, मिलिंद जाधव, संदिप कामत, सुनील कांबळे, शामसुंदर मुणगेकर, अनिल खवणेकर,आदी माजी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. निर्मला प्रभू-पै यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन करून सर्वाचे आभार मानले.