`मृत्यू हा माणसाचा मित्र असतो, कारण तो सर्व दुःखातून माणसाची मुक्तता करतो.

जी. . कुलकर्णींच्या भेट या अश्वत्थामा आणि राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांच्या काल्पनिक भेटीच्या कथेतील हे अश्वत्थामाचं उद्धृत. मृत्यू त्या व्यक्तीची दुःखातून, सर्व व्यापातून सुटका करीत असला तरी मागे राहिलेल्या प्रियजनांसाठी मात्र त्यांचं नसणं हेच फार मोठं दुःख असतं. त्यात अस्तित्वात असलेल्या रुढी परंपरा तर एखाद्या पुरुषाच्या मागे राहिलेल्या त्याच्या पत्नीला `दे माय धरणी ठाय` करुन टाकतात. इतर धर्मांच्या रुढी परंपरांविषयी आपण काही बोलू शकत नाही. पण एकदा आपण त्यांच्या रुढींना मागे टाकून पुढे निघून आल्यानंतर हा प्रवास निरंतर पुढेच जाणारा अर्थात पुरोगामीच असला पहिजे. पण तसे होत नाहीये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो कनिष्ठ जातीतील भारतीयांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धम्मात प्रवेश केला. मी आणि माझे कुटुंबही त्यातीलच एक. पण आज खेदाने म्हणावे लागतेय की जो सातानी धर्म आम्ही सोडून त्यातून बाहेर आलो त्यातील अनिष्ट रुढींचा त्याग अजूनही झालेला नाही. आम्ही 22 प्रतिज्ञांना प्रमाण मानून बौद्ध धम्माचा स्वीकार केला, देव धर्म त्यागले पण रुढी नाहीत. या रुढी प्रामुख्याने आणि तिरस्करणीय स्वरुपात दिसतात ते एखाद्या पुरुषाच्या मृत्यूनंतर होणाऱया सोपस्काराच्या वेळी.

पुरुषाचे निधन झाले की त्याच्या पत्नीवर आभाळ कोसळते, किंबहुना घरातील कोणीही गेले तरी कुटुंबातील प्रत्येक जण अस्ताव्यस्त होतोच. पण इथे पत्नीवर यातनांचा डोंगर कोसळतो तो ह्या रुढींमुळे. मी आजवर माझ्या नात्यातील किमान महिलांना या विदिर्ण अवस्थेत पाहिलंय. आपणही अनेक महिलांना पाहिलं असेल. काही करु शकत नसल्याची हतबलता कितीही आली तरी हा आकडा वाढू नये यासाठी हा लेखप्रपंच.

मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या आणि कुंकू ही बाईची सौभाग्यचिन्हे. मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या ही आभूषणे फक्त महाराष्ट्रातच घातली जातात. हिंदूधर्माने प्रचलित केलेली ही आभूषणे आपणही हौसेने वापरतो, हे मान्य. लग्नाच्या वेळी ही आभूषणे वधूने परिधान केलेली असतात या अपेक्षेने की ती तिने `आजन्म` जिवापाड जपावित. पण तेव्हा ही जपणूक आजन्म रहात नाही जेव्हा तिच्या पतीचे तिच्या आधी निधन होते. कारण ती तिच्याकडून हिसकावून घेतली जातात. जणू त्याच्या मृत्यूला तिच जबाबदार आहे! डोक्यात तिडीक जाईल अशा पद्धतीने त्या सौभाग्यवतीला असौभाग्यवती केलं जातं. विशेष म्हणजे या कार्यासाठी उपस्थित असलेलं महिलामंडळच आघाडीवर असतं. पुरुष मंडळी यात सहभाग घेत नाहीत. कधी काळी पुरुषांनी त्याची सुरुवात केली असेल पण बायकांनी ती काय म्हणून मोठा पुढाकार घेऊन सुरु ठेवली आहेत हे कळायला मार्ग नाही.

पतीच्या अंत्य संस्काराच्या वेळी जमलेल्या बायका त्या नुकत्याच पती हरवून बसलेल्या बाई सोबत तिच्या जखमांवर आणखी ओरखडे काढण्याचं काम करीत असतात. पती निधनाच्या बातमीने सैरभैर झालेल्या त्याच्या पत्नीला त्याच अवस्थेत तेलात माखवलेला मळवट भरला जातो. पतीच्या हयातीत कुंकू ऐवजी टिकली लावणाऱ्या अगदी तिशीतील मुलींसोबत देखील हेच केलं जातं. तिच्या गळ्यात असलेलं एक आणि तिच्याकडे असलेली डिझायनर मंगळसूत्र तिच्या गळ्यात मुद्दाम घातली जातात. तिच्या हाता हिरव्या बांगड्या नसतील तर त्या घातल्या जातात. काही ठिकाणी अख्खा चुडा घातला जातो. हे सगळं कशासाठी तर त्या बाईवर आता आभाळ कोसळलंय हे तिला आणि जमलेल्या सर्वांना कळावं याची तयारी करण्यासाठी. मग सुरु होतो तो रुढींचा प्रताप. पतीचे शेवटचे दर्शन घेत शोकाकूल झालेल्या त्या स्त्रीचं डोकं पाठीमागून एक स्त्री पकडते. तिचं डोकं खाली पतीच्या पार्थिवाच्या पायाजवळ वाकवते आणि कोणालाही काही कळायच्या आत तिचं मळवट पार्थिवाच्या अंगावरील पांढऱ्या कपड्याने खसकन् पुसून टाकते. हातातील बांगड्या कडाकडा फोडून काढते, हे करत असताना ती तिला आणि त्या पत्नीला होऊ शकणाऱ्या जखमांचीही कदर करीत नाही. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र डोक्यातून काढताना सहजपणे काढलं जातंच नाही.... आणि शोकाकूल अवस्थेतील त्या स्त्रीला विदीर्ण अवस्थेतच आपण विधवा झाल्याची जाणीव होते!

आपल्या हाताच्या मुठी वळलेल्या असतात. आपण विरोध करतो. पण `इथे तुमची चळवळ चालवू नका, वेळ काय प्रसंग काय, आणि योग्य अयोग्यच्या बाता कसल्या मारताय` म्हणून दमटावलं जातं. पुरोगामी होत चाललेला पुरुष वर्ग हतबलतेने आपल्याच स्त्रियांनी जपलेल्या प्रतिगामीत्वाच्या खुणा असहायतेने पहात असतो. आपली महिला मंडळे याच कामासाठी आहेत का, हा प्रश्न टोचणी लावत असतो.

ज्या ब्राम्हण वर्गाला आपण रुढी आणि परंपरांसाठी जबाबदार धरतो त्यांच्याकडे सुद्धा ह्या पद्धती नाहीत. खरं तर बौद्धधम्मात सौभ्याग्य अलंकारांना विशेष स्थान नाही. विवाहानंतर सौभाग्यवती म्हणण्याची पद्धत नाही. त्यामुळे हे अलंकार अशा अमानुषपणे काढून घेऊन त्या स्त्रीला असौभग्यवती करण्याच्या दळभद्री व्याकरणाला जागाच नसायला पाहिजे. विधवा किंवा विधुर ही संज्ञा केवळ पुनर्विवाहाच्या वेळीच लागू झाली पाहिजे. इतर वेळी स्त्रीच्या निस्तेज दिसण्यावरुन ती विधवा आहे हे दाखवून देण्याची गरज नाही. बौद्धधम्म हा व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता धर्म आहे. संविधानही तसेच आहे. त्यामुळे एखाद्या स्त्रीने विवाहानंतर आणि अगदी पती निधनांनंतरही तिने कोणते आभूषण कधी घालावे हा सर्वस्वी तिचा निर्णय असू द्यावा. अशा अनेक महिला आहेत ज्यांनी पतीनिधनानंतरही मंगळसूत्र काढलेलं नाही. महिला मंडळांनीच याबाबतीत आता या रुढींना हद्दपार करुन निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे. एका स्त्रीनेच दुसऱया स्त्रीचे आयुष्य सुकर करायला नको का!