आयुष्य एवढं काठोकाठ भरू नका

भरलेल्या आयुष्याचा अट्टाहास करू नका

थोडं रितं राहू द्या जगणं

थोडं अनुभवा ‘उरणं’  

थोडा डचमळू द्या प्रवाह

थोडा हिंदकळू द्या प्रपात

थोडा गाळ हलू द्या खाली बसलेला

थोडा निघू द्या कचरा नको असलेला  

थोडा अवकाश मिळू द्या साचलेपणाला

थोड्या कडा मोकळ्या राहू द्या उच्छ्वासाला

त्याशिवाय अर्धेपण कळणार नाही

त्याशिवाय भारलेपण जमणार नाही   

त्याशिवाय धार चढणार नाही निश्चयाला

त्याशिवाय पंखच घाबरतील उडण्याला

काठोकाठ भरून काठच उरणार नाही

मग उरलं सुरलं जीवनही कधीच कळणार नाही

म्हणून, आयुष्य एवढं काठोकाठ भरू नका

भरलेल्या आयुष्याचा अट्टाहास करू नका....

- विनिशा