तू विचारलेस,
बघ माझी आठवण येते का?
का विचारलंस?
तुला येते का माझी आठवण?
पावसाचं भिरभिरलेपण
कुंद हवेचं हिरवेपण,
पागोळ्यांचं पागलपण,
येतंच असेल तुला माझी आठवण
तेवढ्या ओलेत्या आठवणींपुरतीच मी, नाही का?
कॉफी, कॅडबरीच्या, कारच्या जाहिराती बघून
साडीची, लोंबत्या इअररिंग्सची दुकानं बघून
पुस्तकं, मॅगझीन्स बघून
मुलांची चित्रं बघून
आठवते का मी?
आठवते का मी
राजकीय बातम्या बघून?
वाटतं का माझ्याशी चर्चा करावीशी?
शिवशिवतात का हात मला मेसेज करण्यासाठी?
मला आठवतोस तू सेकंड होमची जाहिरात पाहताना...
तुझ्या न पाहिलेल्या घराच्या अंगणात नाचताना दिसते मी मलाच...
मला आठवतोस तू ग्रीन टीची जाहिरात बघताना...
तुलसी, मिंट, जिंजर तुझे आवडते फ्लेवर्स,
आठवतं मला,
चार सॅशे, मी मुद्दाम पॅक करायचे...
शेवटी स्वप्नांची बुक्कीच उरणार हे ठरलेलं....
अशी “मी” म्हणून मी नसेन आठवत तुला...
पावसातली ओलेती आठवते तशी तर नक्कीच आठवत नसेन....
काय फरक पडतो मी छताकडे पहात रात्र काढते
की
तुझ्या फोटोला गुड नाईट करून दिवास्वप्न पाहू लागते ....
काय फरक पडतो...?
आणि म्हणे “बघ माझी आठवण येते का?”
आया बडा...
- विनिशा
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.