भारतीय लष्करातील स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या वैद्यकीय अधिकारी कॅप्टन गीतिका कौल या जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. 

त्या सियाचीनमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या आहेत. भारतीय लष्कराच्या लेहस्थित ‘फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्स’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ’१४ फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ने पोस्टमध्ये लिहिले आहे, “सियाचीन बॅटल स्कूलमध्ये यशस्वीरीत्या इंडक्शन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल यांची सियाचीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.'' यासोबत त्यांनी काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. 

भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची असलेली सियाचीन ही जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असून ती प्रतिकूल हवामानासाठी ओळखली जाते. भौगोलिक दृष्ट्या पहायचे तर सियाचेन हे एक हिमनग आहे आणि भारत - पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षामुळे जगातील सर्वात लांब हिमनगांपैकी एक आणि जगातील सर्वात उंच रणांगण म्हणून ओळखलं जातं. या भागातील तापमान नेहमी उणे १० ते उणे ५० अंश सेल्सिअस असते. हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगांमधील पूर्वेकडील भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ५,७५३ मीटर म्हणजेच २० हजार फूट उंचीपर्यंत याचा विस्तार आहे. येथून भारतीय लष्कराचे जवान लेह, लडाख आणि चीनवर बारीक नजर ठेवून असतात. भारतीय लष्कराने १९८४ मध्ये सियाचीनमध्ये आपला लष्करी तळ बनवला. असं हे ठिकाण स्त्रियांसाठी अयोग्य असण्याची धारणा यावर्षीच्या म्हणजेच २०२३ च्या जानेवारीकॅप्टन शिवा चौहान यांच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये समावेश करण्याने संपुष्टात आली. स्त्रिया सुद्धा अशा आव्हानात्मक हवामानात प्रतिकूल वातावरणात आपल्या देशासाठी तैनात राहू शकतात हे पुन्हा एकदा गीतिका कौल यांच्या नियुक्तीने दाखवून दिलं आहे.

१४ फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या या मेडिकल ऑफिसर पदावर तैनात होण्यासाठी गीतिका यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये उंचावर चढणे, अतिथंड वातावरणात आवश्यक असलेली विशेष वैद्यकीय कौशल्ये, तसेच अत्यंत कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात केली आहेत. सियाचीनमध्ये सैनिकांचा कार्यकाळ तीन महिन्यांचा असतो. मात्र या तीन महिन्यात त्यांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो आणि लष्करात आता सामील असलेल्या स्त्रिया आपल्या जबाबदाऱ्या निगुतीने पार पाडत आहेत. या सर्वांना कडक सॅल्युट....