मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर प्रशासनाकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर याच वेळी १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या पाच दिवसात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

मंगळवारपासून इंफाळ पूर्व आणि पश्चिम या दोन जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी, थौबल जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला. राज्याच्या गृह विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की प्रतिमा, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० सप्टेंबर दुपारी ३ ते १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत पाच दिवसांसाठी लीज्ड लाइन, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा तात्पुरती निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनी मणिपूरचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, हजारो विद्यार्थी आणि महिला आंदोलकांनी बीटी रोडवरील राजभवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना काँग्रेस भवनाजवळ रोखले. एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसार माध्यमांना सांगितले की, आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगड फेकले.

सोमवारी विविध शाळा आणि महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी इंफाळमधील खवैरामबंद महिला मार्केटमध्ये उभारलेल्या शिबिरांमध्ये रात्र काढली.

विद्यार्थी नेते चौधरी व्हिक्टर सिंह यांनी सांगितले की, आम्ही राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना आमच्या सहा मागण्यांवर उत्तर देण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. हे संपल्यानंतर आम्ही आमच्या कारवाईबाबत निर्णय घेऊ.

मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना रविवारी रात्री दुर्गम धांगबुह गावात घडली. नेमजाखोल लहुगडीम असे मृत महिलेचे नाव आहे. चुरचंदपूर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दोन्ही बाजूंच्या संघर्षादरम्यान मोठ्या प्रमाणात शक्तिशाली बॉम्बचा वापर करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, गावातील काही घरांनाही आग लागली, त्यामुळे स्थानिक लोकांना जवळच्या जंगलात आश्रय घ्यावा लागला. त्याच रात्री, जवळच्या शाळेत तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबार झाला, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.