महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अनेक अभिनेते, अभिनेत्री तसेच लेखक दिग्दर्शक गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यावर झळकत आहेत. 

गौरव मोरे, प्रभाकर मोरे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, प्रियदर्शिनी इंदुलकर अशा या कलाकारांप्रमाणे आता शिवाली परब सुद्धा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण यावेळी ही लोकप्रिय मोना डार्लिंग विनोदी नाही तर एका अत्यंत ज्वलंत विषयावरील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मंगला’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. शिवाली सोबतच महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये आपल्या स्कीट लेखनाने अनेकदा प्रसाद ओक आणि सई ताम्हणकरची प्रशंसा मिळवलेला प्रथमेश शिवलकर या चित्रपटाचे संवाद लिहिणार आहे.  

‘मंगला’ या चित्रपटाच्या पोस्टर वरूनच दिसत आहे की हा चित्रपट अॅसिड हल्ला झालेल्या आणि त्यातून सावरलेल्या एका मुलीची ही कथा आहे.   

या पोस्टरमध्ये शिवालीचे तीन लूक पाहायला मिळत आहेत.एक कौलारू घर आणि कोपऱ्यात एक दाम्पत्य या पोस्टरमध्ये आहे. मंगला नावाच्या एका गायिकेवर सूडाच्या भावनेतून अॅसिड हल्ला झाला होता, कठीण परिस्थितीशी तिने कशी झुंज दिली होती, ते या चित्रपटात पाहायला मिळेल. त्या काळी अॅसिड हल्ल्यासंबंधित कोणताही कायदा नव्हता, त्यामुळे योग्य तो न्याय न मिळाल्याने मंगलाने या परिस्थितीचा सामना कसा केला हे पाहणं रंजक ठरेल.

रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपर्णा हॉशिंग यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे.

अॅसिड हल्ल्यासारखा विषय मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच येत आहे. त्यात शिवाली सारख्या चुलबुली मुलीला एका गंभीर भूमिकेत पाहायला प्रेक्षकही आपल्या पेट्या बांधून बसले आहेत.