गुजरातमधील महिलेसह तिघांविरोधात गुन्हा

काही नावं आणि आडनावं अगदी कॉमन असतात. अशा नावांच्या शोधात आता चोरटे आहेत की काय या शंकेला दुजोरा देणारी घटना घडली आहे.

आपल्या नावाप्रमाणेच असलेल्या नावाचा फायदा घेऊन १६ कोटी रुपयांचे शेअर्स स्वतःच्या खात्यात वळते करून त्याची विक्री केल्याप्रकरणी दहिसर येथील एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी गुजरातमधील एका महिलेसह तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर केला असून याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

वनिता गांधी व सुधा गांधी यांच्या नावावर २०१७ मध्ये बाळकृष्ण इंजस्ट्रीजचे ५४ हजार शेअर्स होते. मात्र हे शेअर्स गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या वनिता गांधी या महिलेच्या डिमॅट खात्यावर वळते करण्यात आले. त्यानंतर त्यांची १६ कोटी २० लाख रुपयांना विक्रीही करण्यात आली. याप्रकरणी दहिसरच्या पीडित वनिता गांधी यांच्या वतीने त्यांचे सल्लागार वैभव जोशी यांनी तक्रार केली असून एमएचबी पोलीस ठाण्यात तोतयागिरी करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या तोतया महिलेसह शेअर्स खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीसह दोन कंपन्यांतील अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. बनावट कागदपत्रांच्या साह्याने केवायसी करून सर्व शेअर्स डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर त्यांची विक्री करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.