महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. 

देशाच्या कुठल्या न कुठल्या कोपऱ्यातून अशा बातम्या रोज येत आहेत. आता उत्तरप्रदेशातून आलेली बातमी अत्यंत धक्कादायक आणि उद्वेगजनक आहे.

उत्तर प्रदेशच्या भोजपूर जिल्ह्यातील एक १७ वर्षांची एक मुलगी २ सप्टेंबर जांगीगंज रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आली आणि वीरनाथ पांडे या व्यक्तीने आपले अपहरण करून बलात्कार केल्याचे आणि हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

तिची विचारपूस केल्यावर पुढील प्रकार उघडकीस आला. मे २०२४ मध्ये या मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी हरवली असल्याची तक्रार कोईरौना पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेतला असता वीरनाथ पांडे या माणसाने तिचे अपहरण केल्याचे समोर आले. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

काही दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र जामिनावर सुटल्यावर त्याने तिच्यावर पाळत ठेऊन ५ ऑगस्ट २०२४ रोजी पुन्हा या मुलीचे अपहरण करून जवळपास महिनाभर स्वत:च्या ताब्यात ठेवलं. या काळात तिच्यावर त्यानं अनेक वेळा बलात्कार केला. नंतर २ सप्टेंबर रोजी तिला जांगीगंज रेल्वे पोलीस स्टेशनजवळ सोडून दिलं आणि पळ काढला.

आरोपीनं जांगीगंज रेल्वे पोलीस स्थानकाजवळ सोडल्यानंतर या मुलीनं लागलीच पोलीस स्थानकात येऊन पोलिसांना घडला प्रकार सांगितला आणि आरोपीनं महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याचंही सांगितलं. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तसेच, पोक्सो कायद्यानुसारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता अनेक वेळा बलात्कार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. इटाहरा चौराहा परिसरातून पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.