इयत्ता आठवीसाठी एन.एम.एम.एस. ही स्पर्धा परीक्षा रविवारी शहरातील भारती विद्यापीठ येथे घेण्यात आली.

जव्हार : जव्हार तालुक्यात राज्य तथा केंद्र सरकारचे शिक्षणाचे धोरण येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देऊन आर्थिक उन्नती होण्यासाठी नाना प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेत आहेत. त्या अनुषंगाने इयत्ता आठवीसाठी एन.एम.एम.एस. ही स्पर्धा परीक्षा रविवारी शहरातील भारती विद्यापीठ येथे घेण्यात आली. यात जव्हार शहर तथा ग्रामीण भागातील ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रविष्ट झाले असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कळविण्यात आली. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन.एम.एम.एस. परीक्षा. 

वार्षिक १२ हजार प्रमाणे बारावीपर्यंत ४८ हजार रुपये मिळणार

 दरम्यान, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे व ज्यांना सातवीमध्ये ५५ टक्के साधारण गटात तर ५० टक्के मागास गटात गुण आहेत, असे जव्हार तालुक्यातील चारशे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. तथापि, पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार प्रमाणे बारावीपर्यंत ४८ हजार रुपये मिळणार आहेत. या परीक्षेसाठी दोन पेपर होते. त्यात एसएटी (शालेय क्षमता चाचणी) व एमएटी (मानसिक क्षमता चाचणी) असे दोन पेपर समाविष्ट होते. रविवारी घेण्यात आलेल्या या परीक्षेत पहिला पेपर सकाळी १०.३० ते १२ तर दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३ या वेळेत झाला.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम शिक्षणासाठी योजना

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी, तसेच प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. 

परीक्षेसाठी दोन विषय

बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी, असे दोन विषय परीक्षेसाठी आहेत. बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून, यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहणार आहे. यात सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, तीन विषय असतील. तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.