पाणी वितरणातील अनियमितता, त्रुटी दूर करण्यासाठी आमदारांनी खडसावल्यावर निर्णय
वसई : वसई विरारच्या नागरिकांना सातत्याने पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. मात्र याचे मूळ प्रशासनातील नळ जोडणीतील गैरप्रकार, पाणी वितरणातील अनियमितता आणि त्रुटी यात आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी वसई विरार महापालिकेने पाणी पथक स्थापन केले आहे. यामध्ये पालिका अभियंता आणि कर्मचारी दर आठवड्यात प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी करणार आहेत. आमदार स्नेहा पंडित-दुबे यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठकीत याबाबत खडसावले होते, तसेच अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे वसई विरार पालिकेने हे पथक तयार केले आहे.
टँकर लॉबी असते सक्रीय
वसई विरार महापालिकेतर्फे शहरातील नागरिकांना सुर्या पाणी प्रकल्प, उसगाव आणि पेल्हार धरणातून दररोज पाणी पुरवठा केला जातो. शहराची व्याप्ती वाढत असून लोकसंख्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी सतत वाढत असते. याच कारणामुळे इथे टँकर लॉबी देखील सक्रीय झाली आहे. पाण्याची मागणी वाढत असल्याने नळजोडणीत, पाणी वाटपात गैरप्रकार आणि अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सतत होत असतात.
सर्वांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे अशी मागणी
अनेक भागांना अद्याप पाणी मिळालेले नाही. ज्यांना पाणी मिळते ते कमी दाबाने मिळत असल्याने पाणी टंचाईची समस्या कायम भेडसावत असते. यासाठी सर्वांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे अशी मागणी करण्यात येत होती. या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वसईच्या आमदार स्नेहा पंडित-दुबे यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले होते आणि पाणी समिती तयार करण्याची सुचना केली होती.
पथकात अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा समावेश
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही आ. स्नेहा पंडित-दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार पालिकेने प्रभागनिहाय पाणी पथक तयार केले आहे. त्यात अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक दर आठवड्याला आपापल्या प्रभागात भेट देऊन पाणी वितरणाचा आढावा घेणार आहे. याबाबत माहिती देताना पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकार्यांनी सांगितले की, हे पथक पाणी वाटप समान कसे होईल त्यावर भर देणार आहे. बेकादेशीर नळ जोडणीचा तपास करण्यात येईल, कमी दाबाने पाणी जात असेल तर त्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येतील. नळ जोडण्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करून ते प्राधान्याने देण्यात येणार आहेत.
प्रत्येकाच्या घरात नळ का नाही?
केंद्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल अशी घोषणा केली आहे. मात्र पालिका १० घरांमागे एक नळ (स्टॅंडपोस्ट) देत आहे. प्रत्येकाच्या घरात नळ का नाही असा सवाल आमदार स्नेहा पंडित - दुबे यांनी केला आहे. चाळींमध्ये दहा घरांमांगे एक नळ देण्याचे धोरण महापालिकेने ठरवले आहे. प्रत्येक घरात नळ द्यायचा असेल तर त्यानुसार ठराव करावा लागेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या घरात नळ नसला तरी प्रत्येकाला पाणी दिले जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.