एकोणपन्नास वर्षीय मनीषा किशोर गाला यांचे १७ डिसेंबरला सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूपश्चात त्यांचे डोळे, त्वचा आणि संपूर्ण देह दान करण्यात आला. 


वसई : हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावलेल्या आपल्या कुटुंबातील स्त्रीचा संपूर्ण देहदान करुन विरारच्या गाला परिवाराने देहदान चळवळीत आपले योगदान दिले आहे. गणपती कुटीर, विवा कॉलेज रोड, विरार पश्चिम येथील मनीषा किशोर गाला (४९) यांचे १७ डिसेंबरला सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मृत्यूपश्चात त्यांचे डोळे, त्वचा आणि संपूर्ण देह गाला परिवाराने दान केला. त्यांचे डोळे देहमुक्ती मिशन कार्यकर्ते सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रिद्धिविनायक हॉस्पिटलमधील डॉ. निकम, डॉ. अवधेश आणि त्यांच्या टीमने स्वीकारुन कॉर्निया सहीयारा आय बँक, ठाणे येथे सुरक्षित पोहोचवले. तर नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली येथील वैष्णवी आणि त्यांच्या टीमने त्वचादान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तसेच त्यांचा संपूर्ण देह नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल लक्ष्मण धुरी, डॉ. स्नेहा आणि डॉ. युवराज भोसले यांच्या सहकार्याने दान करण्यात आला.

मनीषा गाला यांचे पती किशोर आणि संपूर्ण गाला परिवाराने अतिशय सन्मानपूर्वक आणि सेवाभावी भावनेने हे महादान पूर्ण केले. या पवित्र कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वश्री तरुण वोरा, अनिल धरोड, राजेश मैसेरी, चेतन विसरिया, अश्विन विसरिया, भरत लालन, नरेंद्र गाला, सुधीर तांबडे, गिरीश गाला यांचे द फेडरेशन ऑफ ऑर्गन -  बॉडी डोनेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी आभार मानले. मनीषा यांच्या नेत्रदानातून किमान दोन आणि जास्तीत जास्त चार नेत्रहीनांना दृष्टीचा लाभ होणार आहे. त्वचा दानातून अनेक जळीत रुग्णांचे प्राण वाचणार आहेत आणि देहदानाद्वारे शिक्षण घेणारे कित्येक डॉक्टर आणि शरीर विज्ञान शास्त्रात संशोधन करता येणार आहे. गाला परिवाराचा हा निर्णय समाजासाठी नवा विचार देणारा तर आहेच परंतु 'मृत्यूनंतरही आपण अनेकांना नवे जीवन देऊ शकतो' या विचारांची सेवाभावी समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, असे पवार यांनी सांगितले.