प्रगतशील बौद्ध समाज व शहरातील सामाजिक संघटनांच्यावतीने आंदोलन

बदलापूर : परभणी घटनेचे पडसाद बदलापुरातही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रगतशील बौद्ध समाज व शहरातील सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शनिवारी बदलापूर पश्चिमेकडील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. संविधान के 'सन्मान मे हम उतरे मैदान में'अशा घोषणा देत हातात बाबासाहेबांचे फोटो असलेले पोस्टर घेऊन हे आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, शहिद सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे, अशा विविध घोषवाक्यांचे फलकही आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी परभणी घटनेचा निषेध करण्यात आला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यांत यावा. त्याचप्रमाणे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.