हानगरपालिका प्रशासन व  पोलीस प्रशासन संयुक्त कारवाई करणार

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने ही कारवाई अनेक वर्षांपासून टाळली जात आहे. मात्र आता खुद्द महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाला लेखी पत्र देऊन बोगस डॉक्टरांच्या  विरोधात कारवाईस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य  वैद्यकीय डॉ मोहिनी धर्मा यांनी पदभार सांभाळल्यापासून बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई थंडावली आहे. या प्रकरणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने डॉक्टरांच्या प्रमाणपत्रे व वैद्यकिय परवाना यांच्या तपासणीला सूरवात केली असून ३ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. तसेच २६ डॉक्टरांची प्रमाणपत्रे संशयास्पद असल्याचे या कारवाईत आढळून आले आहे. दरम्यान, या कारवाईत पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने ही कारवाई थंडावली असल्याचा गंभीर आरोप केला होता.

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या कारवाईबाबत महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी बोगस डॉक्टरांवर वेळीच कारवाई केली पाहिजे. तसेच बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशा आशयचे पत्र ढाकणे यांनी पोलीस आयुक्त डॉ आशुतोष डुंबरे आणि पोलीस आयुक्त सचिन गोरे यांना पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

२० दिवस उलटूनही कारवाई नाही

आयुक्तांच्या या पत्रानंतरही बोगस डॉक्टरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बोगस डॉक्टरांच्या विषयावर उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कॅम्प नं ४ परिसरातील ३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले. मात्र गुन्हे दाखल होऊन २० दिवस उलटूनही विठ्ठलवाडी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. बोगस डॉक्टरांचे क्लिनिक राजरोसपणे सुरू आहेत. अशी माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी दिली आहे.

२६ डॉक्टरांची आरोग्य विभागाकडून चौकशी

डॉ धर्मा यांनी याबाबत आयुक्त विकास ढाकणे यांना माहिती दिल्यानंतर आयुक्त ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई होण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. २९ नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तसेच तब्बल २६ डॉक्टरांची चौकशी आरोग्य विभागाने सुरु केल्याने, बोगस डॉक्टरांत खळबळ उडाली. महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ धर्मा यांनी यापूर्वी कारवाई केलेल्या सर्व बोगस डॉक्टरांचे क्लिनिक अद्यापही सुरू असल्याची माहिती दिली.