पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील पुरोगामी विचारधारेच्या विविध नागरिकांचा निषेध



पारनेर,  दि. १६ जुलै २०२५ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात दि. १० जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताने जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले आहे. या विधेयकाचा आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्राच्या विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते निषेध करत आहेत. पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील पुरोगामी विचारधारेच्या  पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समविचारी नागरिक यांनी तहसीलदाराद्वारे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे.हे विधेयक संमत करण्यापूर्वी शासनाने नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत जवळ जवळ १२ हजार हरकती शासनाकडे जमा झाल्या. यापैकी साडे नऊ हजार हरकती विधेयकाच्या विरोधात होत्या आणि त्यात हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, या विधेयकांवर कोणत्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आली नाही. हे विधेयक भारतीय संविधानाचे अनुच्छेद १९ अन्वये मिळालेले नागरिकांचे मूलभूत हक्क आणि अधिकार हिरावून घेणारे असून यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जाणार आहे, असे पारनेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. या विधेयकामुळे समाजात हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवणारे सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांचा आवाज संपविला जाणार असल्याची शक्यता आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामुळे साऱ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात आपणास पहायला मिळत आहेत. या घटनेचा विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच या निवेदनात हल्लेखोर दीपक काटे आणि साथीदार यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पारनेर तालुक्यातील पुरोगामी विचारधारेच्या विविध क्षेत्रातील पक्ष, संघटना, संविधानप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि समविचारी नागरिकांनी पारनेर तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी संविधान व लोकशाही जागर समितीचे सचिन नगरे, भारतीय बौद्ध महासभा संघटक सिताराम लाव्हांडे, खादी ग्राम उद्योग संचालक अमित जाधव, भीम आर्मीचे संजुभाऊ सोनवणे, रिपाई राजुभाऊ उबाळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. बाळासाहेब सोनवणे, रिपाइं (निकाळजे) प्रदिप मोरे, आदिवासी पारधी महासंघाचे जि. सरचिटणीस ईश्वर भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उघडे, छत्रपती क्रांती सेनेचे अविनाश देशमुख, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष ॲड. सोमनाथ गोपाळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. मोनिका सोनवणे, ॲड. मयुरी जाधव आदी उपस्थितीत होते.