अॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिला इशारा
मुंबई : अमेरिकेकडून भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याविषयी ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. या आयात शुल्काचा फटका भारतातील मासेमारी, चर्मोद्योग, टेस्क्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स आणि आयटी क्षेत्रालाही येणाऱ्या काळात बसण्याचा धोका असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील फक्त एकाच कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या धोरणामुळे देशातील उद्योग व्यवसायिक आणि कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे, असा धोक्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आज दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेत भारतीय जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. याचा फायदा अंबानी यांना झाला असून, त्याचा तोटा सामान्य भारतीयांना होणार आहे, असा दावा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
ते म्हणाले, रशियाकडून तेल खरेदी सुरू असल्यामुळे अमेरिकेसोबतचे भारताचे संबंध खराब झाले. अमेरिकेबरोबर संबंध खराब झाल्याने ५० टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. भारताचा अमेरिकेसोबत मोठा व्यापार हा टेक्स्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि पेट्रोलियम पदार्थांमधील आहे.
भारतातील वस्त्रोद्योगातील (टेक्सटाइल्स) ५० ते ६० टक्के उत्पादन अमेरिकेला जातात. नव्या आयात शुल्कामुळे या वस्तू अमेरिकेला निर्यात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एक कोटी १० लाख लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. तसेच जेम्स अँड ज्वेलरीची भारतातील व्यवसाय या ट्रम्प टॅरिफमुळे कोसळणार आहे. इलेक्ट्रोनिक्समध्ये एक लाख ८७ हजार, फार्मास्युटिकल्स उद्योगांमध्ये एक लाख ६२ हजार आणि इतरही उद्योगांमध्ये लाखांवर बेरोजगारी निर्माण होणार असल्याचे संकेत त्यांनी आकडेवारीसह दिले आहेत.
मासेमारी उद्योग धोक्यात येणार
मासेमारीच्या उद्योगावर अमेरिकेच्या टॅरिफमुळे मोठा परिणाम होणार आहे. भारतातील एकूण मासे निर्यातीपैकी ९२ टक्के हिस्सा अमेरिकेला जातो. वाढलेल्या टॅरिफमुळे आता मासेमारी उद्योग संकटात सापडणार आहे. चर्मोद्योगातील ५० टक्के हिस्सा अमेरिकेला जातो. भारतातील अशा विविध उद्योगांचा डेटा गोळा केला तर या सर्व उद्योगांमधील चार ते साडेचार कोटी भारतीयांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे, असेही ते म्हणाले.

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.