हा धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणत कोर्टानं फेटाळली विरोधकांची याचिका


मुंबई : कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हैसूरमधील लोकप्रिय दसरा उत्सवाच्या उद्घाटनाबाबत उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी दाखल केलेल्या याचिकांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. “दसरा उत्सवाचे प्रमुख अतिथी बानू मुश्ताक असल्या तर काय बिघडलं? हा धर्मनिरपेक्ष देश आहे” अशी टिप्पणी देखील यावेळी न्यायालयाने केली आहे.

जातीय सलोखा मजबूत करण्याच्या उद्देशाने आणि भारताच्या ‘गंगा जमनी तहजीब’चं (हिंदू-मुस्लीम ऐक्य) उदाहरण सादर करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने प्रसिद्ध लेखिका बुकर पारितोषिक विजेत्या बानू मुश्ताक यांना म्हैसूर दसरा समारंभाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. परंतु, सरकारच्या या आमंत्रणामुळे भारतीय जनता पार्टीसह काही हिंदुत्ववादी संघटना नाराज झाल्या. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला.

म्हैसूर जिल्हा प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या लोकप्रिय लेखिका बानू मुश्ताक यांना म्हैसूर दसरा समारंभाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. याबाबतचं वृत्त समोर येताच उजव्या विचारसरणीच्या संघटना, भारतीय जनता पार्टीचे नेते विरोध करू लागले होते. भाजपा नेते म्हणत होते की “आमच्या परंपरा व धार्मिक भावनांविरोधात जाऊन सरकारने बानू मुश्ताक यांची उद्घाटनासाठी निवड केली आहे.”

दुसऱ्या धर्माच्या महिलेला अशा धार्मिक कार्यक्रमात बोलावणं उचित नाही, हे हिंदूंच्या अधिकारांचं उल्लंघन आहे” असं या संघटनांचं म्हणणं आहे. या संघटना केवळ विरोध करून स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी थेट कर्नाटक उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं.

हिंदुत्ववादी संघटनांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने म्हटलं आहे की “कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला आमंत्रित करणं हे याचिकाकर्त्याच्या कायदेशीर किंवा संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन नाही. याचिकाकर्त्याच्या दाव्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला कुठलंही कारण दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता म्हैसूरमधील लोकप्रिय दसरा समारंभाचं उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बानू मुश्ताक यांचा परिचय :

बानू मुश्ताक या कर्नाटकच्या भारतीय लेखिका, कार्यकर्त्या आणि वकील आहेत, त्यांचा जन्म ३ एप्रिल १९४८ रोजी झाला. त्या कन्नड भाषेत लिहितात आणि "बंदया साहित्य" किंवा "बंडखोर साहित्यिक चळवळ" मधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत, जी १९७० आणि १९८० च्या दशकात उदयास आली आणि जाती आणि वर्ग व्यवस्थेवर टीका करत होती.



मे २०२५ मध्ये, त्यांना त्यांच्या "हार्ट लॅम्प" या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले. या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये दीपा भास्थी यांनी भाषांतर केले आहे. कन्नड भाषेतील एका साहित्यकृतीला आणि एका लघुकथा संग्रहाला हे पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांचे साहित्य दक्षिण भारतातील मुस्लिम महिला आणि मुलींच्या जीवन आणि संघर्षावर लक्ष केंद्रित करते आणि लिंग, ओळख आणि अन्याय यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकते.

Translator Deepa Bhasthi 


मुश्ताक यांचे जीवन आणि कार्य त्यांच्या सामाजिक कार्याशी जोडलेले आहे. त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे आणि हसन सिटी नगरपालिकेत सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्यांनी "मूलतत्त्ववाद आणि सामाजिक अन्याय" कमी करण्याच्या चळवळींमध्ये भाग घेतला आहे आणि मुस्लिम महिलांना मशिदींमध्ये प्रवेश करण्याचा हक्क तसेच मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळेत हिजाब घालण्याच्या हक्काचे समर्थन केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांना भूतकाळात धमक्या आणि "सामाजिक बहिष्कार" सहन करावा लागला आहे.

त्यांनी सहा लघुकथा संग्रह, एक कादंबरी, एक निबंध संग्रह आणि एक कविता संग्रह लिहिला आहे. त्यांच्या साहित्यकृतींचे उर्दू, हिंदी, तमिळ आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांच्या "करी नागरागलु" या एका कथेवर २००३ साली 'हसीना' नावाचा कन्नड चित्रपट तयार झाला होता