मुंबई, दि. ५ : प्रतिनिधी
आबेडकरी चळवळीत गेली साठ वर्षे सातत्याने सहभाग घेणाऱ्या ज. वि. पवार यांच्या 'आंबेडकरी चळवळ:दशा दुर्दशा आणि दिशा' या पुस्तकाचे दिनांक ४ डिसेंबर रोजी मुंबईतील दादरस्थित आंबेडकर भवन येथे सुप्रसिद्ध कार्यकर्त्या दीपा पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सुप्रसिद्ध लेखक अर्जुन डांगळे यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन समारंभास भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रकाशन सोहळ्यास प्राध्यापक आनंद देवडेकर, योगीराज बागुल, डॉ. श्रीधर पवार, प्रा. विजय मोहिते, प्रा. सुहास चव्हाण, सुबोध मोरे, सुमेध जाधव, प्रा. उत्तम भगत, माजी न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, निलेश मोहिते, पत्रकार दीपक पवार, अशोक चाफे इत्यादी विविध क्षेत्रातील प्रमुख उपस्थित होते.
सद्यस्थितीत आंबेडकरी चळवळीचे महत्त्व सांगणारे हे पुस्तक असून सर्वच वक्त्यांनी समय सुचकता दाखवून हे पुस्तक लिहिल्याबद्दल पवार यांचे अभिवादन केले. याच प्रकाशन सोहळ्यात प्रा. आनंद देवडेकर संपादित 'सद्धम्म धम्मदर्शिका' या कॅलेंडरचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.