महाकवी नामदेव ढसाळ यांच्या एका कविता संग्रहाचे शिर्षक लेखास देण्याचे कारण की दिवसेंदिवस महाराष्ट्राचे राजकीय
, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अक्षरश: रसातळाला जाताना पाहून राज्यकर्त्यांपासून, प्रशासन, पोलीस, न्याययंत्रणा या सर्वांना वरील प्रश्न शरमेने विचारावा लागतोय.



खरं तर प्रश्न विचारणाऱ्यांने का शरमेने ग्रस्त व्हावे? उत्तर साधे आहे. समोरचा बेशरमपणाची निचत्तम पातळी गाठतो तेव्हा त्याच्यावर काही प्रश्न विचारणाराच शरमेने काळवंडून जातो. गेल्या पंधरवड्यात घडलेल्या घटना पाहिल्या की कुणाही विवेकी माणसालाच शरम वाटावी.

शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाशी ज्या पद्धतीचा पद्धतीने वाद घातला, ते ऐकून पाहून महाराष्ट्र खरंच साक्षर आहे का? मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा गायकवाडांच्या भाषेला लागू होऊ शकतो का? पुस्तक, प्रकाशन, लेखक, प्रकाशक याविषयी आमदार महाशयांचे अज्ञान हे अज्ञान शब्दाचाच अपमान ठरावा. बराच आरडाओरडा झाल्यावर दिलगिरी व्यक्त करूनही आपले अज्ञान तसेच पुढे रेटणाऱ्या आमदार महाशयांनी गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा, अशी थेट पोलिसांकडे मागणी करून त्यांनी येत्या महाराष्ट्र दिनाला त्यांना महाराष्ट्र भूषण शासनाने सन्मानाने द्यावा, अशी पात्रता सिद्ध केली आहे. आता फडणवीस व शिंदे यांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे.

याप्रसंगातून आपण तुही यत्ता कंची? हा प्रश्न आपण कुणाला विचारावा?

दूसरा प्रसंग हा नागपूरात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व सरसंघचालक यांच्या उपस्थितीत बागेश्वर धामच्या बाबाने छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं त्यावर नंतर मुख्यमंत्र्यांनी रोज घर, आवार शेणाने नीट सारवणाऱ्या स्त्रीलाही लाजवेल अशा पद्धतीने सारवासावर केली. आता अशा विवादास्पद बाबाला व्यासपीठ मिळवून देताना मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री वा सरसंघचालक यांनी नक्कीच काही विचार केला असणार. कारण भाजप व संघ कुठलीही गोष्ट सहज करून जात नाही. आता या प्रसंगात हा बाबा जे बोलला त्यात या तिघांचा काय दोष? असा भाबडा प्रश्न कुणीही विचारेल. पण अशा प्रसंगातून नंतर सहज पाय काढून घेताना भाजप व संघ दरम्यान त्यांना हवं ते पेरून गेलेले असतात! आता या तिघांना की त्या बाबाला विचारायचा का तोच प्रश्न तुही यत्ता कंची?

तिसरा प्रसंग एका कार्यक्रमातला. पुन्हा सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती व त्यांचीच ओजस्वी वाणी. आपल्या अमोघ वक्तृत्वात (शब्द अगदी हेच नसतील पण आशय हाच) ते म्हणाले, भारताला हिंदू राष्ट्र करण्याची गरज नाही, कारण भारत पहिल्यापासूनच हिंदू राष्ट्र आहे. स्वातंत्र्य आंदोलन व स्वातंत्र्योत्तराचा काही कालखंड आपण संभ्रमित होतो. पण २०१४ नंतर आपल्या राष्ट्रीयत्वाची खरी ओळख पटू लागली व राम मंदिर उभारणीनंतर स्पष्टता आलीय. असं बरंच काही ते बोललेत. शब्दांची निवड वगळता ते सर्व कंगना रनौतच्या २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले या वक्तव्याच्या जवळपास जाणारे आहे. त्यामुळे सरसंघचालक कंगना पातळीवर का उतरले, असे विचारत त्यांनाही तुही यत्ता कंची? हा प्रश्न विचारता येऊ शकतो.

वरील तीन प्रसंगासह खरात बाबा, टीसीएस प्रकरण, आणखी एक दोन बाबा, परिवहन मंत्र्यांची मराठी सक्ती व नंतरची सवलत (आणि कदाचित नंतर ते त्रिभाषासूत्र अहवालासारखं गुलदस्त्यात जाऊ शकते) केईमचे नाव बदलावे म्हणून ओढून ताणून जुळवलेली मराठी शब्दरचना व त्याचे इंग्रजी आद्याक्षर लघुरूप पुन्हा केईएमच येणं असा हास्यास्पद प्रकार. मेडिकल कॉऊन्सिल निवडणुकीतील भाजपची तथाकथित डोस बाजी असे सर्व प्रकार पाहिले की महाराष्ट्र राज्याचीच दया येऊन त्यालाच विचारावेसे वाटते की, तुही यत्ता कंची?

 ताजा कलम :

आपमधून भाजपत गेलेले राघव चड्ढा म्हणाले की, मला लोक म्हणत ‘योग्य माणूस पण चुकीच्या पक्षात म्हणून मी शेवटी चुकीचा पक्ष सोडला. हेच वाक्य अटल बिहारी वाजपेयींबद्दल अनेकदा बोलले गेले. अलिकडे नितीन गडकरींबद्दलही बोलतात. यावर वाजपेयींचं उत्तर होतं, अशा संधीला मी चिमटा वापरूनही स्पर्श करणार नाही.तर गडकरी सांगतात, मी आधी स्वयंसेवक आहे, नंतर राजकारणी. पक्ष बदलापेक्षा मी घरी बसेन!राघव चड्ढानी भाजपच्या नव्या फळीला शरण जाताना जुन्या फळीच्या निष्ठा अभ्यासायला हव्या होत्या, म्हणजे मग त्यांना जागा चुकली ही जाणीव झाली नसती.

 

संजय

पवार